राजकारणात माणसाने कमी बोलायला हवे, नारायण राणेही कमी बोलायला हवे, नाहक वाद ओढवून घेऊ नये, पेशन्स नसतील तर पराभवाचे तोंड पाहावे लागते, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्योग मंत्री नारायण राणे यांना दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राणे यांना हा सल्ला दिला. उद्योग मंत्री नारायण राणे यांना सिंधुदुर्गात पराभवाला सामोरे जावे लागले. त्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता, राज म्हणाले, मी यापूर्वीही नारायणरावांना पेशन्स ठेवण्याचा सल्ला दिला होता. पेशन्स ठेवले नाही तर पराभवाला सामोरे जावे लागते. त्यामुळे राजकारणात कमी बोलायला हवे, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला.
खेड नगरपालिकेवर मनसेने पहिल्यांदा झेंडा रोवल्यानंतर मनसे अध्यक्ष यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी खेडच्या मतदारांचे राज ठाकरे यांनी आभार मानले. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी या निवडणुकांमध्ये फारसे लक्ष घातले नव्हेत. हा विजय मनसेच्या इतर नेत्यांनी खेचून आणला, असल्याचे चित्र दिसते आहे.