www.24taas.com, नाशिक
नाशिकमधल्या येवल्यात आज शेतक-यांना बियाणं वाटण्यात येणार होतं. पण या रांगेत शेतकऱ्यांपेक्षा व्यापा-यांचे दलालच पुढे होते. त्यामुळे सहाजिकच शेतक-यांचा उद्रेक झाला. अखेर जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
ग्रामीण भागात ५२ कृषी केंद्रांवर कापसाचं बियाणं विकण्यात येणार होतं. त्यामुळे सकाळपासूनच शेतक-यांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. मात्र या रांगेत व्यापा-यांचे दलालच पुढे होते. पाच हजारांपेक्षा जास्त शेतकरी आणि बियाण्यांची पाकिटं मात्र फक्त अडीच हजारच होती. त्यामुळे शेतकरी चिडले आणि विक्री बंद पाडत तब्बल तीन तास रास्ता रोकोही केला.
शेतक-यांना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. किरकोळ प्रमाणात दगडफेकही झाली. बियाण्याची शासकीय कीमत नऊशे रुपये असली तरी खुल्या बाजारात हेच वाण दोन हजार रुपयांना मिळतं. त्यामुळे व्यापा-यांच्या दलालांनी हे बियाणं घेण्यासाठी गर्दी केली. तसंच ग्रामीण भागात खाजगी विक्री केंद्रांवर बियाणं उपलब्ध करून दिल्यानं शेतक-यांमध्ये नाराजी आहे. खताचा कोट्यावधींचा गैरव्यवहार गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यात उघड झाला होता. आता बियाणं विक्रीतही नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्यानं कृषी विभागानं त्यावर करडी नजर ठेवण्याची गरज आहे .