www.24taas.com, राळेगणसिद्धी
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ताफ्यातल्या गाडीवर नागपुरात दगडफेक झाल्याचा निषेध म्हणून आज राळेगणसिद्धीत बंद पाळण्यात येणार आहे. नागपूरच्या चिटणीस पार्कमध्ये बुधवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली.
या हल्ल्यात एक कार्यकर्ता जखमी झाला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप अण्णांचे निकटवर्तीय सुरेश पठारे यांनी केलाय. याप्रकरणी दोन ते तीन जणांना ताब्यात घेण्यात आलंय. हल्लेखोरांनी यावेळी घोषणाबाजी केल्याचंही पठारे यांचं म्हणणय, तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला नाही, अशी माहिती नागपूरचे काँग्रेसचे अध्यक्ष जिल्हाध्यक्षांनी दिली आहे.
भंडारा जिल्ह्यात अण्णांच्या सभेत सोनिया आणि काँग्रेसविरोधातल्या पुस्तकांचं वाटप करण्यात आलं होतं.. वैयक्तिक टीका करणार नसल्याचं सांगणा-या अण्णांच्या सभेत अशी पुस्तक वाटण्यात आल्यानं चर्चेला तोंड फुटलं होतं.. त्यानंतर अण्णांनी मात्र अशी पुस्तक वाटल्याचा इन्कार करत, हा टीम अण्णांच्या बदनामीचा स्टंट असल्याचं म्हटलं होतं.. यातूनच हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.