www.24taas.com, जैतापूर
जैतापूर प्रकल्पाचा विषय गेल्या काही दिवसांपासून थंड असतानाच ऐन पावसात शिवसेनेच्या मदतीने स्थानिक ग्रामस्थांनी आज अनोखं आंदोलन जाहीर केलंय. प्रकल्पस्थळी घुसून सामुदायिक शेती आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी पोलिसांनी अटकाव केल्यास शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय.
दरम्यान चर्चेनंतरही आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने प्रकल्पस्थळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात ठेवण्यात आलाय. जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी स्थानिक शिवसेना आमदार राजन साळवी यांच्यासह काही आंदोलकांना प्रकल्पस्थळी फिरकण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे मागील चार महिन्यापासून प्रकल्पाला असलेल्या विरोधाची धार काहीशी कमी झाली होती.
मात्र ज्याठिकाणी प्रकल्प होत आहे. ती पूर्वापार शेतजमीन असून याठिकाणी शेती करण हा ग्रामस्थांचा हक्क आहे. असा दावा करत स्थानिकांनी पुन्हा एकदा सामुदायिक शेती आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केलाय.