www.24taas.com, उल्हासनगर
उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरमध्ये एका आईने स्वतःच्या मुलीला वेश्या व्यवसाय करायला भाग पाडलं आहे. आणि मुलीने त्याला नकार दिल्यावर त्या आईने मुलीला आत्महत्या करण्याची धमकी दिली.
उल्हासनगरमधल्या कॅम्प क्रमांक ४ मध्ये गावदेवी मंदिर परिसरात राहणारी पूनम मनीष म्हात्रे ही ४९ वर्षीय महिला मातृत्वाला कलंक ठरली आहे. पूनमने स्वतःच्या पोटच्या मुलीला धमकावून वेश्या व्यवसाय करायला भाग पाडलं होतं. २५ वर्षांची मोना आईच्या जबरदस्तीमुळे गेल्या ९ वर्षांपासून वेश्याव्यवसाय करत होती. मात्र काही दिवसांपूर्वी मोनाने वेश्याव्यवसाय करायला नकार दिल्यावर, पूनमने तिला आत्महत्या करण्याची धमकी दिली.
मात्र वेश्याव्यवसाय सोडायचाच असं ठरवलेल्या मोनाने आईच्या या प्रकाराला कंटाळून अखेर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मोनाने पोलिसांना सगळा प्रकार सांगितल्यावर पोलीसांनी पूनमला त्वरीत अटक केली आहे. पोलिसांनी मोनाला बदलापूरच्या महिला सुधार गृहात पाठवलं असून पूनमने आणखी कुणा मुलींना वेश्या व्यवसाय करायला भाग पाडलंय का याचा पोलीस तपास करत आहेत.