ओलिताखालच्या जमिनीवर तहानलेले शेतकरी!

औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यात गोदावरी पाटबंधारे विभागानं सात धरणं बांधली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, बारामाही कोरड्या पडलेल्या एकाच नदीवर तीन किलोमीटरच्या अंतरावर तीन धरणं बांधण्यात आली आहेत.

Updated: May 20, 2012, 04:48 PM IST

www.24taas.com, औरंगाबाद

 

औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यात गोदावरी पाटबंधारे विभागानं सात धरणं बांधली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, बारामाही कोरड्या पडलेल्या एकाच नदीवर तीन किलोमीटरच्या अंतरावर तीन धरणं बांधण्यात आली आहेत. अशा नियोजनशून्य कारभारमुळं तालुका नेहमीच तहानलेला राहिलाय.

 

मराठवाड्यावर निसर्गाची नेहमीच अवकृपा राहिलीय. त्यात भर पडली ती सरकारच्या नियोजनशून्य कारभाराची. परिणामी गंगापूर तालुक्यात गवळीशिवरा, खडक वाघळगाव, रांजणगाव, देरळ, धामेरी पळसगाव आणि सिल्लेगाव अशी सात धरणं असूनही तालुका कोरडाच राहिलाय. ही धरणं बांधताना गोदावरी पाटबंधारे विभागानं त्यात पाणी येणार कसं? याचा विचारही केलेला नाही. मार्तंड नदीवरच चक्क तीन धरणं बांधण्यात आली आहेत. ही नदीच बारामहिने कोरडी असते. मग धरणं भरणार तरी कशी? परिणामी कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीप्रश्न कायम आहे. या धरणांमुळं ६० गावं ओलिताखाली येतील, अशी अपेक्षा होती. अर्थातच, ती फोल ठरली. धरण शेजारीच असूनही सर्वच गावांना टँकरने पाणीपुरवठा होतोय. सरकार दरबारी शेतकऱ्यांच्या जमिनी ओलिताखाली असल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात धरणांच्या जागी खेळांची मैदानं झाली आहेत. त्यामुळे कोरड्या धरणातून तहान भागणार कशी, असा संतप्त सवाल गावकरी करताहेत.

 

राज्याच्या अर्थसंकल्पातही मराठवाड्याच्या पदरात भरीव असं काही पडत नाही. आणि जे मिळतं त्याचं अशा नियोजनशून्य कारभारानं मातेरं होतं.