राष्ट्रपती निव़डणुकीची अधिसूचना लागू ?

राष्ट्रपतीपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. २५ जुलैपर्यंत निव़डणूक प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. त्यामुळं आजच अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे,

Updated: Jun 12, 2012, 06:05 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

राष्ट्रपती निव़डणुकीची आज अधिसूचना लागू होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी मुख्य निवडणूक आयुक्त व्ही एस संपत पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते राष्ट्रपतीपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. २५ जुलैपर्यंत निव़डणूक प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे.

 

उद्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत दिल्लीत महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.  केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचा काबुल दौरा रद्द झालाय. १४ जूनला प्रणव मुखर्जी काबूलच्या दौ-यावर जाणार होते. मात्र ऐनवेळी हा दौरा रद्द करण्यात आलाय. सोमवारी काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रणव मुखर्जी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

 

लवकरच  राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचं नाव सोनिया गांधी जाहीर करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रणव मुखर्जी यांचा काबूल दौरा रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दरम्यान राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत सोनिया गांधींनी ममता बॅनर्जींशी दूरध्वनीवरुन चर्चा केली आहे.

 

आज संध्याकाळी ममता बॅनर्जी दिल्लीत येणार आहेत. त्यानंतर उद्या ममता आणि सोनिया यांच्यामध्ये प्रत्यक्ष चर्चा होणाराय. तसंच ममता बॅनर्जी उद्या मुलायम सिंहाचीसुद्धा भेट घेणार आहेत. राष्ट्रपतीपदाबाबत प्रणव मुखर्जींचं नाव चर्चेत आहे. मात्र अद्याप ममतांनी प्रणवदांच्या नावाला समर्थन जाहीर केलेलं नाही.