पंतप्रधानांच्या मदतीला धावले टाटा

भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कारभारावर अनेक स्तरांवरून टीकेची उठल्यानंतर ‘टाटा ग्रुप’चे अध्यक्ष रतन टाटा हे मनमोहन सिंग यांच्याबाजुने उभे ठाकलेत. गुरुवारी, रतन टाटा यांनी पंतप्रधानांचं जोरदार समर्थन करत त्यांना पाठिंब्याची आवश्यकता असल्याचं म्हटलंय.

Updated: Jul 19, 2012, 01:44 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कारभारावर अनेक स्तरांवरून टीकेची उठल्यानंतर ‘टाटा ग्रुप’चे अध्यक्ष रतन टाटा हे मनमोहन सिंग यांच्याबाजुने उभे ठाकलेत. गुरुवारी, रतन टाटा यांनी पंतप्रधानांचं जोरदार समर्थन करत त्यांना पाठिंब्याची आवश्यकता असल्याचं म्हटलंय.

 

विरोधक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्वच स्तरांवर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजकीय धोरणांची नाचक्की सुरू आहे. पण, रतन टाटांनी मात्र पंतप्रधानांची साथ देत ट्विटरवर त्यांना पाठिंबा जाहीर केलाय. ‘हे खरं आहे की गेल्या १२ महिन्यांत आपल्या देशाच्या विकासाची गती खुंटलीय. त्यामुळे गुंतवणुकदारांचा भारतावरचा विश्वासही उडत चाललाय, महागाईनं कळस गाठलाय आणि सरकार मात्र छोटी छोटी पावलं उचलण्यासाठी भरपूर वेळ घेतंय. पण याबद्दल फक्त एकट्या पंतप्रधानांना दोषी ठरवणं म्हणजे दिशाभूल करणं’ असल्याचं टाटांना वाटतंय. पंतप्रधानांनी सरकारच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी हीच वेळ असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय.

 

सोबतच टाटांनी विरोधकांचाही समाचार घेतलाय. ‘सरकारला पाडणं हे विरोधकांचं एकमेव ध्येय आहे. अंतर्गत राजकारणामुळे आपल्याला किती नुकसान होतंय याचा विरोधकांनी विचार करायला हवा,’ असा टोलाही टाटांनी हाणलाय.

 

अडथळ्यांना बाजुला सारून लोकांना दिलेली वचनं पाळण्यासाठी आणि देशाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी पंतप्रधानांनी त्वरीत पावलं उचलावीत, असं आवाहन टाटांनी केलंय. यासाठी ‘सध्याच्या कठिण प्रसंगात पंतप्रधानांना पाठिंबा मिळण्याची नितांत आवश्यकता आहे. देशाला पुन्हा एकदा आर्थिक स्तरावर सावरण्यासाठी पंतप्रधान काय पावलं उचलतायत याकडेच प्रत्येकाचे डोळे लागलेत. पंतप्रधानांनी योग्य गोष्टी घडवून आणण्यासाठी कडक धोरण स्विकारायलाच हवं,’ असंही टाटांनी म्हटलंय.

 

‘इन्फोसिस’चे सह-संस्थापक नारायण मूर्तींनीही, ‘सक्रीय आणि गुंतवणूकीसाठी अनुकूल देश म्हणून जगानं भारताकडे पाहण्यासाठी भारताला कठीण पावलं उचलण्याची गरज’ असल्याचं म्हटलंय. तर विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांच्या मते, भारत हा सध्या ‘नेत्याशिवाय’ काम करणारा देश बनलाय.

 

.