मोठ्या 'जबाबदारी'साठी युवराज सज्ज!

राहुल गांधींनी मोठी जबाबदारी स्विकारावी, अशी काँग्रेस नेत्यांकडूनच होणाऱ्या मागणीबद्दल आज पहिल्यांदाच राहुल गांधी यांनी मौनव्रत तोडलंय. आपण लवकरच पक्षात आणि सरकारमध्ये मोठी जबाबदारी स्विकारणार असल्याचं सुतोवाच आज खुद्द ‘युवराजां’नी केलंय.

Updated: Jul 19, 2012, 12:36 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

राहुल गांधींनी मोठी जबाबदारी स्विकारावी, अशा काँग्रेस नेत्यांकडूनच होणाऱ्या मागणीबद्दल आज पहिल्यांदाच राहुल गांधी यांनी मौनव्रत तोडलंय. आपण लवकरच पक्षात आणि सरकारमध्ये मोठी जबाबदारी स्विकारणार असल्याचं सुतोवाच आज खुद्द ‘युवराजां’नी केलंय.

 

काँग्रेसचे महासचिव आणि खासदार राहुल गांधी यांनी आज नवी दिल्लीमध्ये आपण अगोदरपेक्षा मोठी जबाबदारी स्विकारण्यासाठी तयार असल्याचं म्हटलंय. ही मोठी जबाबदारी काय असेल यावर मात्र त्यांनी मातोश्री सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे बोट दाखवलंय.

 

गेल्या काही दिवसांतून पक्षातून आणि मीडियामधून राहुल गांधींच्या सरकारमधील भूमिकेबद्दल विविध प्रश्न उपस्थित केले जात होते. प्रणव मुखर्जी यांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीनंतर काँग्रेसमधील नंबर दोनचा नेता कोण? याबद्दलही प्रश्न उपस्थित होत होते. दोन दिवसांपूर्वी सोनिया गांधींना याबद्दल विचारलं असता त्यांनी ‘राहुलची भूमिकेबद्दल राहुलच निर्णय घेईल इतर कुणीही नाही... त्यांनी कोणती जबाबदारी कधी स्विकारावी याबद्दल त्यांच्यावर कोणताही दबाव नाही’, असं म्हटलं होतं. त्यामुळे हे स्पष्ट आहे.

 

आज राहुल गांधींनी स्वत:च पक्षात आणि सरकारमध्ये मोठी जबाबदारी स्विकारणार असल्याचं सांगून पक्षाचा भार हलका केलाय. राहुल गांधींवर यांच्याकडे ग्रामीण विकास विभाग किंवा मनुष्यबळ विकास मंत्रालय सांभाळण्याची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.

 

.