दिल्ली पोलिसांच्या जाळ्यात सहा दहशतवादी!

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने एका पाकिस्तानी दहशतवाद्यासह ६ दहशतवाद्यांना अटक केली आहे. या सर्वांनी जर्मन बेकरी स्फोट, चिन्नस्वामी स्टेडियम स्फोट आणि जामा मशीद गोळीबार प्रकरणात मोठी भूमिका बजावल्याचा पोलिसांनी दावा केला आहे.

Updated: Nov 30, 2011, 11:48 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने एका पाकिस्तानी दहशतवाद्यासह ६ दहशतवाद्यांना अटक केली आहे. या सर्वांनी जर्मन बेकरी स्फोट, चिन्नस्वामी स्टेडियम स्फोट आणि जामा मशीद गोळीबार प्रकरणात मोठी भूमिका बजावल्याचा पोलिसांनी दावा केला आहे.

या दहशतवाद्यांना दिल्ली, बिहार, चेन्नईमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. कातिल सिद्दीकी, अजमल, गौहर, जमाली, भवर अजीज, इरशाद आणि अब्दुल रहमान असं अटक करण्यात आलेल्या दशहतवाद्यांची नावं आहेत.
या सर्व दहशतवाद्यांना कोर्टात हजर करून पोलिस कोठडीही देण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांचं विशेष पथक १९ सप्टेंबर २००९मध्ये जामा मशीद परिसरात झालेल्या गोळीबाराचा तपास करत होतं. या तपासादरम्यान त्यांच्या हाती आलेल्या धाग्यादोऱ्यांच्या आधारे त्यांनी अजमल नावाच्या एका पाकिस्तानी नागरिकाला बिहारमधून ताब्यात घेतलं. अजमलच्या चौकशीतून त्याचा बिहारमधील साथीदार कतिल सिद्दीकी याला तब्यात घेण्यात आलं. या दोघांनीच जामा मशीदीबाहेर गोळीबार केल्याचं त्यांनी पोलिसांकडे कबूल केलं.

त्यानंतर पोलिसांनी या दोघांचीच आणखी सखोल चौकशी केली. कतिल सिद्दीकीच्या चौकशीत चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या स्फोटाचीही माहिती मिळाली आहे. बंगलोरमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर आठ बॉम्ब लावण्यात आले होते. पण त्यापैकी फक्त दोन बॉम्ब फुटल्याने दहशतवाद्यांचा मनसुबा फसल्याचं कतिलने पोलिसांना सांगितलं. त्याचप्रमाणे अजमल आणि कतिल या दोघांनीही पुण्याच्या जर्मन बेकरी स्फोटातही रेकी आणि इतर अनेक महत्त्वाची कामं पार पाडल्याची कबूली दिली आहे.
या दोघांच्या महितीवरून गौहर जमाली, भवर अजीज, इरशाद आणि अब्दुल रहमान या चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांचे इंडियन मुजाहिदीनीशी थेट संबंध असल्याचीही पोलिस सूत्रांनी माहिती दिली आहे.

Tags: