www.24taas.com, मुंबई
बॉलिवूडचा 'ऍक्शन कुमार' म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार पुन्हा एकदा १०० कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. अक्षय कुमारच्या 'रावडी राठोड' या सिनेमाने केवळ १० दिवसांत १०० कोटी रुपयांची घसघशीत कमाई करण्याचा विक्रम केला आहे. अक्षय कुमार अजूनही भल्या भल्या खान अभिनेत्यांना टक्कर देऊ शकतो, हे यातून त्याने सिद्ध केलं आहे.
अक्षयचा 'रावडी राठोड' सिनेमा हा खरंतर तामिळ सिनेमाचा रिमेक असल्यामुळे काही श्रेय मूळ तामिळ सिनेमाला जात असलं, तरी रावडी राठोडचं यश हे अक्षय कुमारचंच यश आहे. एकट्या अक्षय कुमारच्या जीवावर आता निर्माते १०० कोटी रुपये कमावू शकतात, असा विश्वास अक्षय कुमारने सिनेसृष्टीला दिला आहे. याच वर्षी 'रावडी राठोड'पूर्वी आलेल्या 'हाऊसफुल्ल-२' या अक्षय कुमारच्याच सिनेमानेही १०० कोटींचा पल्ला पार केला होता. मात्र, त्या सिनेमात अक्षय बरोबर इतर डझनभर कलाकार असल्यामुळे त्याच्या यशाचं श्रेय एकट्या अक्षय कुमारला देता येत नव्हतं. मात्र, 'रावडी राठेड'चं श्रेय अक्षयलाच जातं.
'रावडी राठोड'द्वारे १०० कोटींची कमाई करून अक्षय आता आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान, अजय देवगण, हृतिक रोशन यांच्या पंक्तित जाऊन बसला आहे. रावडी राठोडमध्ये अक्षय कुमारबरोबर सोनाक्षी सिन्हा होती. सोनाक्षीचा हा दुसराच सिनेमा होता. पदार्पणातील पहिलाच चित्रपट 'दबंग' आणि आता 'रावडी राठोड' या दोन्ही चित्रपटांनी १०० कोटींचा पल्ला पार केल्यामुळे सोनाक्षी सिन्हाही सध्या १०० कोटी क्लबची अग्रगण्य सभासद बनली आहे.