पोलिसांच्या मारहाणीनंतर तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड

चोरी प्रकरणी सचिन रवींद्र जैस्वार या तरूणाला पोलिसांनी धारावी गांधीनगरमधून ताब्यात घेतले होते.

Updated: Jul 22, 2018, 03:44 PM IST
पोलिसांच्या मारहाणीनंतर तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड title=

मुंबई: सायनच्या लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालयात एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं संतप्त झालेल्या नातेवाईकांनी जोरदार दगडफेक केली. पोलिसांच्या गाड्यांवर केलेल्या या दगडफेकीत पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे पाच जवान जखमी झालेत. जमावाने पोलिसांच्या तीन वाहनांना लक्ष्य बनवून त्यांच्या काचाही फोडल्या. या प्रकरणी सायन पोलिसांनी १०० अज्ञात लोकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

धारावी पोलिसांनी चोरी प्रकरणी सचिन रवींद्र जैस्वार या १७ वर्षीय तरूणाला धारावी गांधीनगरमधून ताब्यात घेतले होते. यानंतर तुरुंगात पोलिसांनी त्याला जबर मारहाण केली. मात्र, सचिनने आपला गुन्हा कबूल केला नव्हता. अखेर पोलिसांनी सचिनला सोडून दिले होते. मात्र, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सचिनची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच सचिनचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे.