शिंदेंनी 'सारं काही दिल्लीकडे' म्हणताच रुपाली चाकणकरांची मोठी मागणी; म्हणाल्या, 'आताच नाही तर...'

Rupali Chakankar Big Deamd: राज्यामध्ये महायुतीला मोठं यश मिळालं असून यामध्ये अजित पवारांच्या पक्षाचा महत्त्वाचा वाटा आहे. दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला नेत्याने मोठी मागणी केली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 28, 2024, 02:32 PM IST
शिंदेंनी 'सारं काही दिल्लीकडे' म्हणताच रुपाली चाकणकरांची मोठी मागणी; म्हणाल्या, 'आताच नाही तर...' title=
अजित पवारांच्या पक्षाची मोठी मागणी (फाइल फोटो, सौजन्य - फेसबुकवरुन साभारम)

Rupali Chakankar Big Deamd: महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाचं उत्तर विधानसभेची मुदत संपून दोन दिवस उलटल्यानंतरही मिळालेलं नाही. 230 हून अधिक जागा मिळवलेल्या महायुतीच्या घटक पक्षांमधील चर्चेमुळे मुख्यमंत्री कोण हे अद्याप जाहीर झालेलं नाही. सर्वाधिक जागा जिंकणारा भारतीय जनता पार्टी, 57 जागा जिंकणारा शिंदेंचा शिवसेना पक्ष आणि 41 जागा जिंकणारा अजित पवारांचा पक्ष आधी मुख्यमंत्री पदावर निवडणुकीपूर्वी दावेदारी सांगत होते. मात्र मिळालेल्या जागांच्या आधारे भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा भाजपा कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ नेतृत्वानेही बोलून दाखवल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्याने त्यांनाच मुख्यमंत्री करावं अशी मागणी केली. या साऱ्या रेटारेटीदरम्यान बुधवारी शिंदेंनी दिल्लीतील भाजपाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतली तो मान्य असेल असं जाहीर करत एक पाऊल मागे घेण्याची भूमिका घेतली. असं असतानाच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एक नवीन मागणी कार्यकर्त्यांच्यावतीने करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकरांनी ही मागणी पुढे ठेवली आहे.

आज दिल्लीत ठरणार मुख्यमंत्री कोण

आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार? यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांबरोबर फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये हे चारच नेते उपस्थित असणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार हे दिल्लीत दाखल झाले असून फडणवीस दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती दुपारी समोर आली. तर एकनाथ शिंदे हे दुपारनंतर दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे दिल्लीतून आज राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण असेल यासंदर्भातील मोठी घोषणा होऊ शकते असं मानलं जात आहे. भाजपाच्या नेत्याची या पदावर वर्णी लागेल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र असं असतानाच आता अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्यांकडून मोठी मागणी करण्यात आली आहे.

नेमकी काय मागणी केली?

मुख्यमंत्रिपदासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रुपाली चाकणकरांनी, "आताच नाही तर आधीपासून दादांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही मागणी करतोय. आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना वाटतं की दादा मुख्यमंत्री व्हावेत. प्रत्येक कार्यकर्त्याची ही अपेक्षा असते की त्याचा नेता मोठा व्हावा. सहाजिकच आमची कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे की दादा मुख्यमंत्री व्हावेत," असं मत व्यक्त केलं आहे. 

विधानसभेला दमदार कामगिरी

अजित पवारांच्या पक्षाने शरद पवारांच्या पक्षाला तगडी टक्कर देत अधिक जागा जिंकल्याचं निवडणुकीच्या आकडेवारीतून समोर आलं. स्वत: अजित पवारांनी बारामतीमध्ये आपलाच दरारा असल्याचं 1 लाखांहून अधिक मतांनी पुतण्या युगेंद्र पवार यांना पराभूत करुन दाखवून दिलं. शरद पवारांच्या पक्षाला केवळ 10 जागा विजय मिळाला तर 56 जागा लाढवून अजित पवारांच्या पक्षाने तब्बल 41 जागा जिंकल्या. स्ट्राइक रेटच्या बाबतीत भाजपानंतर अजित पवारांच्या पक्षाचाच नंबर लागतो. त्यामुळेच आता अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. अजित पवारांनीही यापूर्वी अनेकदा मुख्यमंत्री होण्यीची इच्छा बोलून दाखवली होती.