Lower Parel Bridge : लोअर परळ पुलाचं काम 5 वर्षांनंतरही अपूर्ण

Lower Parel Bridge : हा पूल धोकादायक असल्यामुळं 24 जुलै 2018 ला बंद करण्यात आला होता. 

Updated: Jun 15, 2022, 12:16 AM IST
Lower Parel Bridge : लोअर परळ पुलाचं काम 5 वर्षांनंतरही अपूर्ण title=
फाईल फोटो

मुंबई :  मुंबईतील लोअर परळमधील पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या पुलाचं काम गेल्या 5 वर्षांपासून रखडलंय. हा पूल धोकादायक असल्यामुळं 24 जुलै 2018 ला बंद करण्यात आला होता. या पूलाचं काम 2 वर्षांमध्ये पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र आता दुप्पट वेळ ओलांडूनही या पूलाचं काम पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे स्थानिकांसह दररोज इथून प्रवास करणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय. (work on lower parel bridge should be done expeditiously demand of locals residents)

या पूलाचं काम सुरु असल्याने बाईकस्वारांना मोठा वळसा मारुन जावं लागतंय. तसेच पादचाऱ्यांनाही लोअर परळ स्थानकाबाहेर पडल्यानंतर करी रोड नाक्याला येण्यासाठी गोल फिरून यावं लागतंय. त्यामुळे वेळ वाया जातो. 

संथगतीने काम होत असल्याचा आरोप

दरम्यान या पूलाचं काम संथगतीने होत असल्याचा आरोप करण्यात येतोय. तसेच या भागात मोठ्या प्रमाणात बहुराष्ट्रीय कार्यालयं (Mnc Company) असल्याने सकाळी ते रात्री जवळपास 20 तास लोकांची ये-जा सुरु असते. त्यामुळे या दरम्यान ये-जा करणाऱ्यांना दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

त्यामुळे रात्रीच्या वेळेस काम करण्यात येतं. मात्र या रात्रीच्या कामामुळे स्थानिकांची झोपमोड होते. स्थानिक रहिवाशांना याचा सर्व त्रास सहन करावा लागतोय. याचा सर्व परिणाम हा त्यांच्या मानसिक आरोग्यावर होतोय. त्यामुळे रेल्वे आणि महानगरपालिका प्रशासनानं हे काम जलद गतीनं करावं,  अशी मागणी इथले नागरिक आणि एकूणच प्रवाशी करतायेत.