मुंबई : मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी सकाळी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतले. सोमवारी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी देवरा यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुंबई दक्षिण मतदार संघातून देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सध्याच्या घडीला मुंबईकरांना भेडसावणारा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा गृहनिर्माणाचा असून हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिले. मिलिंद देवरा यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर सर्वच पक्षांतून प्रतिक्रिया व्यक्त होतायत. देवरांच्या नियुक्तीनंतर मुंबई काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण होईल अशी प्रतिक्रिया एकनाथ गायकवाड यांनी दिलीय. तर काँग्रेसमध्ये काहीही बदल झाले तरी फरक पडत नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी दिली.
दरम्यान, निवडणूक लढण्यात जास्त रस असल्यामुळे मुंबई अध्यक्षपद आपणहून सोडलं असा दावा संजय निरूपम यांनी केलाय. पराभवाला घाबरून उत्तर मुंबई सोडली या आरोपात तथ्य नसल्याचं निरूपम म्हणाले. तसंच मुंबईतली आता सगळी गटबाजी संपल्याचं त्यांनी नमूद केलं. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना राज्यात काँग्रेसमधील गटबाजी आणि अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणात समोर येऊ लागला आहे. काँग्रेसमध्ये गोंधळाचे वातावरण असल्याचं समोर आलं आहे. गटबाजीमुळे निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून संजय निरुपम यांची उचलबांगडी करून मिलिंद देवरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चंद्रपूर मतदारसंघातील नाराजीमुळे जाहीर केलेला उमेदवार काँग्रेसला बदलावा लागला आहे. औरंगाबादमध्ये पक्षाच्या ज्येष्ठ आमदारानेच बंडाचा झेंडा उगारला आहे. तर रामटेकमध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी झाली आहे. त्याआधी विरोधी पक्षनेत्याच्या मुलानेच भाजपात प्रवेश केल्याने पक्षात निरुत्साह आहे. भाजपाचा मुकाबला करण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनीच लोकसभा निवडणूक लढवणार नाही असा पावित्रा घेतला होता. या गोंधळात काँग्रेसला राज्यात लोकसभा निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे.