भाजपानं पवारांनाच टार्गेट करण्याचं कारण काय?

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी भाजपानं शरद पवारांनाच टार्गेट करायचं ठरवलंय. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष असे सगळेच बडे भाजपा

Updated: Oct 11, 2019, 11:50 PM IST
भाजपानं पवारांनाच टार्गेट करण्याचं कारण काय? title=

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी भाजपानं शरद पवारांनाच टार्गेट करायचं ठरवलंय. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष असे सगळेच बडे भाजपा नेते पवारांवर तुटून पडतायत. भाजपानं पवारांनाच टार्गेट करण्याचं कारण काय?

वयाच्या ७९ व्या वर्षी शरद पवार पायाला भिंगरी लावल्यासारखे राज्यभर फिरतायत. दरदिवशी २ ते ३ प्रचारसभांचा धूमधडाका त्यांनी उडवून दिलाय. त्यांच्या सभांना गर्दीही होत आहे. त्यामुळंच की काय, सत्ताधारी भाजपानंही पवारांनाच टार्गेट करायचं ठरवलंय... दिल्लीतून खास प्रचारासाठी आलेल्या अमित शाहांनी शरद पवारांवरच निशाणा साधला.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी तर पवारांना थेट शिंगावरच घेतलं. चंद्रकांत पाटील हे कोथरुड मतदारसंघात अडकून पडल्याची टीका पवारांनी केली होती. त्याचा समाचार घेताना पाटलांनी जोरदार फटका लगावला.

पवारांवर हल्लाबोल करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तरी कसे मागे राहतील? नागपूर गुंडांचं शहर झाल्याचा भडीमार पवारांनी केला होता. कोपरगावच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं.

भाजपाच्या नेत्यांनी पवारांच्या विरोधात पाया मजबूत करून ठेवलाय. येत्या १३ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार आहेत. त्यावेळी ते देखील पवारांनाच टार्गेट करून कळस चढवणार का, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.