इंजिनातील बिघाडामुळे पश्चिम व मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

आज दिवसभर पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिरानेच सुरु राहण्याची शक्यता

Updated: Mar 8, 2019, 09:17 AM IST
इंजिनातील बिघाडामुळे पश्चिम व मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत title=

मुंबई: माहीम स्थानकानजीक एक्स्प्रेस गाडीच्या इंजिनात उद्भवलेल्या तांत्रिक बिघाडामुळे शुक्रवारी सकाळपासून पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या बिघाडामुळे गाड्यांचे वेळापत्रक संपूर्णपणे कोलमडले आहे. परिणामी सध्या या मार्गावरील अप आणि डाऊन दिशेच्या गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. माहीमजवळ मालगाडीच्या इंजिनामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. यामुळे हार्बर लाईनवरील अंधेरीकडे जाणारी आणि येणारी रेल्वेलाईन बंद होती. आता हे इंजिन बाजुला करण्यात आले आहे. 

तर दुसरीकडे मध्य रेल्वेमार्गावरील वाहतुकीचाही बोजवरा उडाल्याचे समजते. जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतुकही १५ ते २० मिनिटे उशिराने सुरु आहे. 

ऐन गर्दीच्यावेळी झालेल्या या गोंधळामुळे कामावर निघालेले चाकरमनी आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, काही वेळापूर्वीच माहीम स्थानकातील बिघाड दुरुस्त करण्यात आला. मात्र, दरम्यानच्या काळात वेळापत्रक कोलमडल्याने वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी बराच काळ जावा लागेल, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.