Breaking : काँग्रेसला वगळून तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न? काय ठरलं बैठकीत

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली

Updated: Dec 1, 2021, 04:54 PM IST
Breaking : काँग्रेसला वगळून तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न? काय ठरलं बैठकीत title=

मुंबई : महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक या पवार यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांची तब्बल एक तास बैठक चालली. 

युपिएला वेगळा पर्याय
या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी यांनी मोठं विधान केलं. युपिए आता अस्तित्वात नाही असं ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं आहे. पण जर वेगळी आघाडी होणार असेल तर त्याचं नेतृत्व कोण करणार यावर मात्र ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांनी उत्तर देणं टाळलं. काँग्रेस वगळून अन्य  पक्षांची आघाडी तयार करण्याचे प्रयत्न आता अवघ्या देशभरात सुरु झालेले आहेत हे स्पष्ट झालं असून आणि ममता बॅनर्जी या प्रयत्नांमध्ये आघाडीवर आहेत.

आज देशात जी परिस्थिती आहे त्याविरोधात एक मजबूत पर्याय उभं करण्याची गरज आहे, हे  एकटं कोण करु शकत नाही, जे जिथे मजबूत आहे त्यांना सोबत घेऊन हे करता येईल भाजप विरोधात असणाऱ्या सर्वांना एकत्र घेऊन यूपीए व्यतिरिक्त वेगळा पर्याय देणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. 

ममतांच्या विधानाचं पवारांकडून समर्थन
ममता बँनर्जी यांनी आज मुंबईतील एका कार्यक्रमात राहुल गांधी याच्यांवर नाव न घेता हल्लाबोल केला. विदेशात राहून कसं चालेल? हा सवाल उपस्थित केला. ममता बॅनर्जी यांच्या या विधानाचं शरद पवार यांनी समर्थन केलं आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा जो विजय झाला, नेता रस्त्यावर राहिला तरच विजय होतो हे ममतांचं म्हणणं बरोबर आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांची वेगळी भूमिका
काँग्रेसला वगळून युपिएला वेगळा पर्याय देण्याच्या ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेवर मात्र  शरद पवार यांनी मात्र आपली वेगळी भूमिका मांडली.  काँग्रेसला वगळण्याचा प्रश्न नाही, भाजपविरोधात असलेल्या कुणलाही एकत्र यायचं असेल तर त्यांचं स्वागत आहे, नेतृत्व हा महत्त्वाचा मुद्दा नाही, सक्षण पर्याय उपलब्ध करुन देणं महत्त्वाचा विषय असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. जे सगळ्यांसह येण्याबरोबर तयार आहे त्या सर्वांबरोबर मिळून पुढे जाऊ, भाजप विरोधात एकत्र येणाऱ्या सगळ्या पक्षांचं स्वागत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

2024 च्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाविरोधात एक मजबूत नेतृत्व उभं करण्याची गरज आहे, त्या दृष्टीने या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे.