Mumbai Weather Update : उत्तर भारतासोबतच मुंबईतही थंडीला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि परिसरात शनिवारी पसरलेल्या धुक्यामुळे मुंबईकरांना थंडीचा चांगलाच अनुभव घेता आला आहे. मुंबईत शनिवार हा या मोसमातील सर्वात थंड दिवस ठरला आहे. शनिवारी सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. शनिवारी उपनगरातील किमान तापमान 17.5 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होतं. अशातच हवामान तज्ज्ञांच्या मते, 7 ते 9 जानेवारी दरम्यान थंड रिमझिम पाऊस देखील पडण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे रात्रीच्या तापमानात घट झाल्याचे हवामानतज्ज्ञांनी म्हटलं आहे.
शनिवारी सकाळी, मुंबईचे किमान तापमान 17.5 अंश सेल्सिअसपर्यंत घसरून मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने नागरिकांनी हवेत गारवा जाणवला. दुसरीकडे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या थंडीत मुंबई आणि परिसरात हलका पाऊस पडू शकतो. अरबी समुद्राकडून पूर्वेकडे येणाऱ्या ओलसर वाऱ्यांमुळे राजस्थानमधील प्रणाली (वेस्टर्न डिस्टर्बन्स) सोबत मुंबई आणि परिसरात ढगाळ वातावरण राहील आणि 7 ते 9 जानेवारी दरम्यान रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांमध्ये थंडी अनुभवता येत असल्याने आता थंडीचा मोसम सुरु झाला आहे. शनिवारी उत्तर कोकण वगळता किनारपट्टीवर इतर कुठेही किमान तापमानात घट झाली नाही. अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली होती. शनिवारी सांताक्रूझ केंद्रावर तापमानात मोठ्या प्रमाणात घट नोंदवली गेली. सांताक्रूझ येथे 17.5 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. तर कुलाबा येथे 20 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण अधिक असताना मुंबईच्या किमान तापमानामध्ये घट नोंदवली गेली.
दरम्यान, तापमानातील घसरणीबरोबरच, दररोजच्या तापमानात घट झाल्यामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक पातळी कमी झाल्यामुळे शहराच्या आकाशात पहाटे धुके पसरले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सादर केलेल्या डेटावरून असे दिसून आले आहे की, बीकेसी (211) आणि वांद्रे पूर्वेकडील खेरवाडी (208) मध्ये नोंदवलेल्या हवेच्या गुणवत्तेसह एकूण हवेचा गुणवत्ता निर्देशांक शनिवारी मुंबईत 134 वर पोहोचला. दरम्यान, भायखळा (97) मध्ये सर्वोत्तम हवेचा गुणवत्ता निर्देशांक आढळून आला आहे.