...म्हणून संजय राऊतांच्या 'त्या' मागणीला आदित्य ठाकरेंचा नकार

पावसाळ्यात याठिकाणी मोठ्याप्रमाणावर चिखल होऊन अडचणी वाढतील. 

Updated: May 17, 2020, 04:13 PM IST
...म्हणून संजय राऊतांच्या 'त्या' मागणीला आदित्य ठाकरेंचा नकार title=

मुंबई: मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे सध्या महानगरपालिकेकडून शहरातील मोकळ्या जागांवर कोरोना केअर सेंटर्स उभारली जात आहेत. वानखेडे स्टेडियमवरही अशाचप्रकारे सेंटर उभारले जाणार असल्याची चर्चा होती. तेव्हा वानखेडे शेजारीच असणारे ब्रेबॉर्न स्टेडियमही कोरोनाच्या उपचारासाठी वापरले जावे, असा प्रस्ताव शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडला होता. त्यांनी शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांना ब्रेबॉर्नवर कोरोना सेंटर उभारण्यासंदर्भात विचारणा केली होती.

मात्र, आदित्य ठाकरे यांनी संजय राऊतांच्या या मागणीला नम्रपणे नकार दिला. आदित्य यांनी म्हटले की, संजयजी आपण खेळाची मैदाने कोरोना केअर सेंटरसाठी वापरू शकत नाही. कारण, याठिकाणी माती आहे. त्यामुळे पावसाळ्यात याठिकाणी मोठ्याप्रमाणावर चिखल होऊन अडचणी वाढतील. त्यामुळे आपण कोरोना सेंटरसाठी काँक्रिट बेस किंवा ठोस पाय असलेल्या मोकळ्या जागांच्या शोधात आहोत, असे आदित्य यांनी सांगितले.

 

दरम्यान, वानखेडे स्टेडियमच्या परिसरातील नागरिकांनीही पालिकेच्या या संभाव्य निर्णयाला विरोध केला होता. वानखेडेच्या परिसरात मोठ्याप्रमाणावर ज्येष्ठ नागरिक राहतात. कोरोना सेंटरमुळे त्यांच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो. त्याऐवजी सरकारने या परिसरातील खाली असलेल्या इमारतींमध्ये कोरोनाग्रस्तांच्या उपचाराची सोय करावी, असे या रहिवाशांचे म्हणणे होते. मात्र, आता पालिकेनेही वानखेडेवर कोरोना सेंटर न उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा प्रश्न निकाली निघाला आहे.