मुंबई : लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजुर आपापल्या गावी निघून गेले आहेत. यामुळे आता मराठी तरूणांना चांगली संधी उपलब्ध आहे असं म्हटलं जात आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी आपलं मत सामनातून मांडल आहे.
'मुंबईतून परप्रांतीय मजुरांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले आहे. आता त्यांच्या जागा मराठी तरुणांनी घ्यायला हव्यात, संधी आली आहे असं सांगितलं जात आहे. ते तितकेसे खरे नाही. जे निघून गेले ते सर्व असंघटित, रोजंदारीवर काम करणारे होते. मुंबईच्या आर्थिक नाड्या आजही परप्रांतीयांच्याच हाती आहेत हे सत्य कसे नाकारणार?' असं परखड सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
कोरोनानंतर मजुरांनी मुंबई-महाराष्ट्रातूनही मोठय़ा संख्येने स्थलांतर केले. झुंडीच्या झुंडी चालत निघाल्या. यावर काही राजकीय नेते म्हणाले, ”बरे झाले, हे संकटकाळी मुंबईतून पळून गेले. आता मराठी तरुणांनी या संधीचा फायदा घ्यावा.” केदार शिंदे हे शाहीर साबळे यांचे नातू. केदार शिंदे ट्विटरवर सांगतात, ”स्थलांतरित कामगार आता सर्व नोंदणी करून आपापल्या गावचा रस्ता धरतायत. आपल्याकडे त्यांचा ‘डाटा’ उपलब्ध झालाय. मराठी तरुणांना ते करीत असलेल्या कामांची माहिती करून द्यावी. मराठी तरुणांना हीच संधी आहे. नंतर गळे काढून रडू नका, त्यांनी कामं हिसकावली!” केदार शिंदे यांच्या मताशी अनेकांनी सहमती व्यक्त केली. जणू आता मुंबई रिकामीच झाली. नोकऱ्या रिकाम्या झाल्या. मराठी पोरांनी जाऊन फक्त हजेरी लावायला सुरुवात करायची आहे. प्रत्यक्षात तसे चित्र आहे काय? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
'जो मजूरवर्ग चालत उत्तर प्रदेश, बिहारकडे गेला त्याची जागा बेरोजगार मराठी तरुण घेईल असे वाटत नाही. हा संपूर्णपणे असंघटित मजूरवर्ग होता. तो रोजंदारीवर कंत्राटी पद्धतीने काम करीत होता. रोजची मजुरी हेच त्याचे उपजिविकेचे साधन होते. हा बहुसंख्य मजूरवर्ग कोठे होता? तर बांधकाम व्यवसायात, रस्ते, पूल उभारणीच्या कामात, कंत्राटी पद्धतीच्या सुरक्षा रक्षकात, घरेलू कामगार किरकोळ स्वरूपातील भाजी-फळ विक्रेता, मॉलमधली साफसफाई करणारा, रेल्वे रुळांवर खडी टाकणारा कामगार, पाणीपुरी, भेळपुरी, चणे विकणारा, दूधवाला, इस्त्रीवाला असं काम करणारे हे हजारो लोक असंघटित कामगार आहेत. त्यांना कोणतेही वर्तमान आणि भविष्य नव्हतेच. ते भीतीने मुंबईसारखी शहरे सोडून गेले या सर्व ‘संधी’ आहेत व आता मराठी तरुणांचे कल्याण होईल, असे म्हणता येणार नाही', असं मत राऊत यांनी व्यक्त केलं.