बाईकस्वारांना वाचवायला गेला अन्... भरधाव ट्रकखाली सापडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Virar News : विरारमध्ये गुरुवारी रात्रीच विजेचा धक्का लागल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नारंगी फाटक रस्त्यावर ट्रक पलटल्याने तिघांना जीव गमवावा लागला आहे

आकाश नेटके | Updated: Apr 14, 2023, 02:42 PM IST
बाईकस्वारांना वाचवायला गेला अन्... भरधाव ट्रकखाली सापडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू title=

प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : विरार (Virar News) पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथील नारंगी फाटक रस्त्यावर भीषण अपघात झालाय. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. एक भरधाव हायवा ट्रक रस्त्यातच उलटल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रकखाली सापडून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. स्थानिकांनी आणि विरार पोलिसांनी (Virar Police) तात्काळ घटनास्थळी धाव घेत ट्रक बाजूला करण्याचा प्रयत्न केला.

शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास नारिंगी फाटकापासून ग्लोबल सिटीच्या दिशेने हा भरधाव ट्रक जात होता. मात्र वेगात विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वारांना वाचवण्यात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. यावेळी ट्रकखाली सापडल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती अर्नाळा पोलिसांना मिळाल्यानंतर स्थानिक नागरिक व अग्निशमन पथकाच्या जवानांच्या मदतीने ट्रक बाजूला करण्याचे काम सुरु करण्यात आले. मात्र हा ट्रक मालाने भरलेला असल्याने तीन क्रेनच्या साहाय्याने हा ट्रक बाजूला काढण्यात आला.

विरारमध्ये शॉक लागल्याने दोघांचा मृत्यू

विरारमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान मोठा अपघात झाला. रॅलीवरुन परतणाऱ्या वाहनावरील ध्वज ट्रान्सफॉरमरला लागल्याने रॅलीतल्या लोकांना विजेचा धक्का बसला. विजेच्या धक्क्याने 2 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 7 जण गंभीर जखमी झाले. विरारमधील मनवेल पाडा परिसरात ही दुर्घटना घडली. रुपेश सुर्वे आणि सुमित सूत अशी या मृत तरुणांची नावे आहेत. रात्री साडेदहा वाजता मिरवणूक संपल्यानंतर कार्यकर्ते घरी परतत होते. त्यावेळी मिरवणुकीच्या वाहनावर सहा जण उभे होते. वाहनावरील लोखंडी रॉड जवळच्या ट्रान्सफॉरमरच्या संपर्कात आल्याने या सर्वांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यात सर्वजण होरपळले. 

तर उमेश कनोजिया (18), राहुल जगताप (18), सत्यनारायण (23) हे तिघे गंभीर जखमी असून त्यांना मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अस्मित खांबे (32) या तरुणाची प्रकृती स्थिर आहे.

गाडी पलटल्याने एकाचा मृत्यू

दरम्यान, केज-कळंब रोडवरील विठाई पुरम वस्तीजवळ भरधाव वेगात असलेल्या गाडीचा अपघात झाल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. गाडीच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या हॉटेलात घुसून पलटी झाली. यामध्ये एकजण जागीच ठार झाला तर तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जालना जिल्ह्यातील परतूर पंचायत समितीचे माजी सभापती रामेश्वर भास्कर तनपुरे व नागेश उद्धवराव तनपुरे आणि निवृत्ती आप्पासाहेब तनपुरे राहणार वाढोना तालुका परतुर हे महिंद्रा गाडीने कळंबहुन केजच्या दिशेने भरधाव वेगाने जात होते. मात्र भरधाव वेगातील गाडीवरचे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून त्यांची गाडी केज येथील विठाई पुरम जवळील माऊली सिनेमा गृहाच्या जवळ रोडवर पलटी झाली आणि ही गाडी तेथील एका हॉटेलमध्ये घुसली. या भीषण अपघातात रामेश्वर भास्कर तनपुरे यांचा जागीच मृत्यू झाला.