शिवडी-न्हावाशेवा पुलावर आणखी एका नियमाचा भंग; टोल कर्मचारी झोपले होते का? नेटकरी संतापले

टोलनाके आणि पोलिसांची गस्त असतानाही ऑटो रिक्षा पुलावर नेमकी पोहोचली कशी याचं आश्चर्य नेटकऱ्यांना वाटत आहे. नेटकऱ्यांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 16, 2024, 03:35 PM IST
शिवडी-न्हावाशेवा पुलावर आणखी एका नियमाचा भंग; टोल कर्मचारी झोपले होते का? नेटकरी संतापले title=

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. 21.8 किमी लांबीचा हा पूल फक्त सर्वात मोठाच नाही तर तर समुद्रात उभारण्यात आलेला सर्वात लांब पूल आहे. शनिवारी या पुलाचं लोकार्पण झाल्यानंतर हौशी मुंबईकरांनी एकच गर्दी केली होती. यावेळी पुलावर लोक सेल्फी घेण्यासाठी थांबल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मुंबईकरांकडून नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे अनेक फोटो, व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे आता मुंबई पोलिसांनीही अशा बेजबाबदार नागरिक आणि वाहन चालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

अटल सेतूवर चक्क एक रिक्षा धावताना दिसली आहे. एक्सवर एका युजरने रिक्षा पुलावर धावत असल्याचे फोटो शेअर केले आहेत. यानंतर नेटकरी रिक्षा पुलावर पोहोचलीच कशी? अशी विचारणा करत आश्चर्य व्यक्त करत आहेत. यावेळी अनेकांनी मुंबई पोलिसांना टॅग करत रिक्षा चालकावर कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. 

एका युजरने म्हटलं आहे की, "हा तिथपर्यंत पोहोचलाच कसा? दोन्ही बाजूला टोलनाके असतानाही रिक्षाला पुलावर जाण्याची परवानगी मिळाली कशी?". दरम्यान एका युजरने किमान तो फोटो काढण्यासाठी थांबला तर नाही अशी उपहासात्मक कमेंट केली आहे. तर एकाने ऑटो सेतू म्हटलं आहे. 

एका युजरने रिक्षाच्या मागे लिहिलेल्या पाटीवर लक्ष वेधत कमेंट केली आहे की, 'त्याने रिक्षाच्या मागे FIR Milenge लिहून आधीच इशारा दिला आहे'.

पुलावर कोणत्या वाहनांना परवानगी?

या पुलावर कार, टॅक्सी, मिनी बस, हलकी वाहनं, मिनी बस, टू एक्सल बस, छोटे ट्रक प्रवास करु शकतात. 

कोणत्या वाहनांना बंदी?

मोटरबाईक, मोपेड, थ्री-व्हीलर टेम्पो, रिक्षा, ट्रॅक्टर तसंच धीम्या गतीने जाणाऱ्या वाहनांना परवानगी नसणार आहे. बैलगाडीलाही परवानगी नाही.   

टोल किती?

या पुलाचा वापर केल्यास एकावेळी 500 रुपयांचं इंधन वाचेल असा दावा आहे. पण पुलावरुन प्रवास करताना टोल भरावा लागणार आहे. जर तुम्ही एकाच बाजूचा टोल भरत असाल तर 250 रुपये भरावे लागतील. पण रिटर्नचाही काढला तर 375 रुपये होतील. रोज प्रवास करणाऱ्यांसाठी पासची सुविधाही आहे. कारमधून प्रवास करणाऱ्यांसाठी डेली पास 625 तर मंथली पास 12 हजार 500 रुपये असेल.   

वेगमर्यादा किती असेल? 

मुंबई पोलिसांनी वेगमर्यादा ताशी 100 किमी ठरवली आहे. पूल चढताना आणि उतरताना ही मर्यादा ताशी 40 किमी असेल.   

या पुलाच्या बांधकामासाठी 17 हजार 840 कोटींचा खर्च आला आहे. अटल सेतू बनवण्यासाठी 1,77,903 मेट्रिक टन स्टील आणि 5,04,253 मेट्रिक टन सीमेंट वापरण्यात आलं. हा ब्रीज 100 वर्षं असाच उभा राहील असा दावा आहे.   हा फक्त देशातील सर्वात लांब नाही, तर समुद्रात उभारण्यात आलेला सर्वात मोठा पूल आहे. या पुलावर ऑटोमेटेड टोल कलेक्शन आणि इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट सिस्टमही आहे. याशिवाय हा पूल बनवण्यासाठी मोठ्या ऑर्थॉट्रॉपिक स्टील डेकचा वापर करण्यात आला आहे. यामुळे पूल उभारण्यासाठी जास्त खांबाची गरज भासली नाही. भारतात पहिल्यांदाच याचा वापर करण्यात आला आहे.