Video : ...संजय राऊत यांना एकटं पाडलं जात आहे का? पाहा उद्धव ठाकरे काय म्हणाले

संजय राऊत यांना अटक करण्यात आल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या कुटुंबियांची भेट घेतली

Updated: Aug 1, 2022, 05:22 PM IST
Video : ...संजय राऊत यांना एकटं पाडलं जात आहे का? पाहा उद्धव ठाकरे काय म्हणाले title=

Uddhav Thackeray : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ईडीने (ED) रविवारी अटक केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर सोमवारी त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. कोर्टाने संजय राऊत यांना तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. 

त्याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या भांडूप येथील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि धीर दिला. यानंतर पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावरील कारवाईबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी अटकेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली नाही, संजय राऊत यांना एकटं पाडलं जातंय का? असा सवाल केला. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

"मला या फालतू प्रश्नांना उत्तरे द्यायची नाहीत. मी संजय राऊत यांच्या घरी जाऊन आलो. संजय राऊत आणि माझे कौटुंबिक चांगले संबंध आहेत. संजय राऊत माझे जुने मित्र आहेत आणि कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांनी या दंडेलशाहीविरुद्ध लढू शकत ही ठिणगी टाकलेली आहे," असे उद्धव ठाकरे म्हणाले.

संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी

खासदार संजय राऊत यांना विशेष न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटक केल्यानंतर संजय राऊत यांना सोमवारी ईडी कोर्टात हजर करण्यात आलं होतं. ईडीने राऊत यांना आठ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. न्यायमूर्ती एम जी देशपांडे यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली.