'त्या भेटीमागे....' काँग्रेस आमदार-फडणवीस यांच्या भेटीवर भाई जगताप यांचं स्पष्टीकरण

मुंबईचे माजी पालकमंत्री काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती

Updated: Aug 1, 2022, 04:41 PM IST
'त्या भेटीमागे....' काँग्रेस आमदार-फडणवीस यांच्या भेटीवर भाई जगताप यांचं स्पष्टीकरण title=

सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई : राज्यात सध्या मोठा सत्तासंघर्ष सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknat Shinde) यांच्या बंडानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं. त्यानंतर शिवसेना (Shivsena) विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष सुरु आहे. शिवसेनेच्या ४० आमदारांसह १२ खासदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंब दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे सरकार सत्तेवर आलं आहे. या सत्ता स्थापनेमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याचे म्हटले जात होते.

एकीकडे शिवसेनेला गळती सुरु असतानाच काँग्रेसच्या एका आमदाराने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने खळबळ उडाली आहे. या भेटीनंतर अनेक राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. या भेटीनंतर काही वेगळी सत्ता समीकरणे पाहायला मिळणार का अशीही चर्चा सुरु आहे.

मुंबईचे माजी पालकमंत्री काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र काँग्रेसने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. या भेटीचे नेमकं कारण मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सांगितले आहे.

अस्लम शेख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीस सागर बंगल्यावर गेले होते. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. विशेष म्हणजे भाजप नेते मोहित कंबोजही यावेळी उपस्थित होते. या भेटीनंतर भाई जगताप यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

राज्यात आता दोनच मंत्री आहेत एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस. दोघांचे मंत्रिमंडळ असल्याने मुंबई विषयी काही काम असल्यास जायचे कुठे? त्यासाठी या दोनच मंत्र्यांना भेटणे गरजेचे आहे. मुंबईतल्या काही कामाविषयी अस्लम शेख यांनी फडवणीस यांची भेट घेतली, असे भाई जगताप यांनी म्हटले आहे.

राज्यात मंत्रिमंडळ नाही तसेच रविवारी सुट्टी असल्याने उपमुख्यमंत्री फडवणीस यांची सागर या निवासस्थानी अस्लम शेख यांनी भेट घेतली आहे, असा दावा भाई जगताप यांनी केला आहे. 

अस्लम शेख यांच्या या भेटीचे व्हिडिओ समोर आल्यानंतर नाही भेट नेमकी कशासाठी होती याची चर्चा सुरु झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांनी अस्लम शेख यांच्यावर 1 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यापैकी ३०० कोटी प्रकरणी कागदपत्रे संबंधित यंत्रणांकडे दिल्याचा सोमय्यांनी दावा केला होता. त्यानंतर दोनच दिवसात शेख यांनी फडणवीस यांची भेट घेतली.