मुंबई : मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७० वर्षीय धर्मा पाटील यांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. धर्मा पाटील यांची प्रकृती चिंताजनक असून ते सध्या व्हेन्टिलेटरवर आहेत.
प्रकल्पात गेलेल्या शेत जमीनीला योग्य मोबदला न मिळाल्याने त्रस्त झालेल्या धर्मा पाटील यांनी सोमवारी मंत्रालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातले आहेत. त्यांना पोलिसांनी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केलं असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
काल रात्री पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी हॉस्पिटलला येऊन धर्मा पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. रावल हे त्यांच्या शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार आहेत.
२०१६ मध्ये धर्मा पाटील यांची पाच एकर फळबाग जमीन ही औष्णिक वीज प्रकल्पासाठी घेतली गेली. यामध्ये बागायती क्षेत्रातील विहीर, ७०० फूटांचा बोअर, ६०० आंब्याची झाडे यांचाही समावेश होता. तशी नोंदही ७/१२ व भूंसपादन करताना केलेल्या पंचनाम्यातही आहे.
तसंच पाटील यांच्या शेजारच्या गट नंबरची पावणे दोन एकर जमीनही बागायती नोंद आहे. त्यांना एजंटनं मध्यस्थी केल्यानं प्रशासनाकडून १ कोटी ८९ लाख इतकी भरपाई मिळाली तर धर्मा पाटील यांची पाच एकर जमीन बागायत असतानाही त्यांना केवळ ४ लाख भरपाई मिळाली.
या अन्यायाविरोधात ते गेली दोन वर्षे दाद मागत आहेत. जिल्हा प्रशासनानने दखल न घेतल्यामुळं ते मुलाला घेऊन मंत्रालयात आले होते... परंतु इथंही दखल घेतली गेली नाही. तीन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, महसूलमंत्री, कृषीमंत्री, पालकमंत्री यांना निवेदन आणि दोन वेळा स्मरणपत्रे दिली होती... तरीही त्यांना कुणाकडूनही दाद मिळाली नाही.
काल रात्री घटनेनंतर रूग्णालयात धाव घेणाऱ्या पर्यटनमंत्री आणि शिंदखेडाचे स्थानिक आमदार जयकुमार रावल यांनाही तीन महिन्यापूर्वी निवेदन देऊन पाटील यांनी पाठपुरावा केला होता. परंतु त्यांच्याकडूनही काहीच पाऊल उचलले गेले नाही.
सर्वांकडे दाद मागूनही कुणीच प्रतिसाद देत नसल्याने धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन केले.
या संपूर्ण प्रकरणात भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणेचा चेहरा समोर येतो. भूसंपादन प्रक्रियेत घुसलेले एजंट, अधिकाऱ्यांशी त्यांचे लागबांधे यामुळं प्रामाणिक आणि पात्र शेतकऱ्यांवर मात्र अन्याय होतोय.