प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : राज्याला पावसाने (monsoon) आठवडाभरापासून झोडपून काढलं आहे. राज्यात पावसाची संतताधार सुरु असून अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. पालघर (Palghar) जिल्ह्यालाही पावसाने अक्षरक्षः झोडपून काढलं आहे. अशातच घरासमोरील नाल्यात बुडाल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नाल्यात पडल्यानंतर या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपाचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला आहे. स्थानिक पोलिसांनी (Vasai Police) याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
घरासमोरील वाहत्या नाल्यात बुडून 44 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वसई पश्चिमेच्या गिरिज येथे ही दुर्घटना घडली आहे. ब्रायन कार्व्हालो (44) हे वसई पश्चिमेच्या गिरीज येथील सातोडीवाडी येथे रहात होते. गुरूवारी मुसळधार पाऊस पडत असल्याने परिसरात सर्वत्र पाणी साचले होते. सकाळी 11 च्या सुमारास कार्व्हालो हे बिस्कीट आणण्यासाठी घराबाहेर पडले होते. मात्र घरासमोरील नाला ओलांडताना ते नाल्यात पडून वाहून गेले. कार्व्हालो कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला असता ते नाल्यात पडल्याचे आढळले. स्थानिकांच्या मदतीने कार्व्हालो यांना नाल्याबाहेर काढून तात्काळ उपचारासाठी वसईच्या बंगली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रात्री दहा वाजता उपचारादरम्यान कार्व्हालो यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वसई पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
वसई विरारमध्ये शाळांना सुट्टी
हवामान विभागातर्फे पालघर जिल्ह्यासह वसई विरारमध्ये शनिवारी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व शैक्षणिक आस्थापनांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच महानगरपालिकेमार्फत अतिवृष्टीच्या वेळी उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे.
हिंगोलीत खड्ड्यात पडून सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वटकळी येथे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडलीये. वटकळी येथे पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभासाठी खोदलेल्या खड्यात पडून सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. आरोशी यातळकर अस मृत्यू झालेल्या चिमुकलीच नाव आहे. पाणीपुरवठा विभागाच्या जलकुंभासाठी हा खड्डा खोदण्यात आला होता. पण काही कारणाने जल कुंभाचे बांधकाम वेगळ्या ठिकाणी झाले. पण खोदलेला हा खड्डा मात्र बुजवण्यात आला नसल्याने यात पावसाचे पाणी साचले. या खड्ड्यात पडून एका चिमुकलीला आपले प्राण गमवावे लागले आहेत.