Crime News : धक्कादायक! डॉक्टरकडूनच नवजात बाळाची 7 लाख रुपयांना विक्री; मुली आणि मुलांसाठी होत वेगवेगळे दर

Ulhasnagar Crime : उल्हासनगरमधल्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. महिला डॉक्टरकडूनच नवजात बाळाची विक्री करण्यात येत असल्याने खळबळ उडाली आहे.पोलिसांनी या प्रकरणी महिला डॉक्टरसह पाच जणांना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

आकाश नेटके | Updated: May 18, 2023, 05:12 PM IST
Crime News : धक्कादायक! डॉक्टरकडूनच नवजात बाळाची 7 लाख रुपयांना विक्री; मुली आणि मुलांसाठी होत वेगवेगळे दर title=

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar Crime) एक डॉक्टरच नवजात बाळांची लाखो रुपयांना खरेदी विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. उल्हासनगर कॅम्प नंबर चारच्या कंवरराम चौक परिसरात असलेल्या महालक्ष्मी नर्सिंग होममधील डॉक्टर चित्रा चेनानी या आपल्या टोळीच्या माध्यमातून नवजात बाळाची खरेदी विक्री (child trafficking racket) करत होत्या. पोलिसांनी महालक्ष्मी नर्सिंग होमवर धाड टाकत हा सर्व प्रकार समोर आणला आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Ulhasnagar Police) डॉक्टरसह पाच जणांना अटक केली आहे.

स्थानिक सामाजिक संस्थेला या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून या सगळ्या प्रकारचा पर्दाफाश केलाय. नाशिकहून आलेल्या एका महिलेच्या 22 दिवसाच्या बाळाला सात लाखांना बनावट ग्राहकाला विकताना ठाणे क्राईम ब्रांच आणि महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे.

मुला मुलींचे वेगवेगळे दर

धक्कादायक म्हणजे मुली आणि मुलांचे वेगवेगळे दर या महिला डॉक्टरने ठरवले होते. गुरुवारीच  22 दिवसांच्या बाळाची विक्री सात लाखांत होणार होती. दुसरीकडे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यात ही टोळी सक्रिय होती आणि नवजात बालकांच्या विक्रीचे रॅकेट चालवत होती, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये एक एमबीबीएस डॉक्टरसह 4 जणांचा सहभाग आहे.

पोलिसांनी काय सांगितले?

"बुधवारी दुपारी तीन वाजता गुन्हे शाखेच्या युनिटने महालक्ष्मी नर्सिंग होम येथे छापा टाकला. मिळालेल्या माहितीनुसार नर्सिंग होममध्ये अर्भकाची सात लाख रुपयांना विक्री होत असल्याचे समोर आले. या सर्वांमध्ये डॉक्टरांचा सहभाग होता. या प्रकरणात चार महिला आणि एक पुरुषाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार भादवि कलम 370 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वांना अटक करण्यात आली आहे. नवजात अर्भकाची एकूण सात लाख रुपये किंमत ठरली होती. महिला डॉक्टरचा यामध्ये सहभाग होता. त्यांनी असे कृत्य का केले याचा तपास करण्यात येणार आहे. उर्वरित दोन महिला या नाशिक आणि पुरुष बेळगाव येथील आहे. एक महिला उल्हासनगर येथे राहणारी आहे. हे सर्वजण रॅकेट चालवत होते. या प्रकरणाचा तपास करण्यासाटी दहा लोकांचे पथक नेमण्यात आले आहे," अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.