सत्संगमध्ये हेडफोन घालून ध्वनी प्रदुषणावर मात

वाढत्या ध्वनी प्रदुषणावरून न्यायालयानेच कान उपटल्यावर यंदाच्या दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीला काहीसा चाप लागला. पण, उल्हासनगरमध्ये एक सत्संग मात्र अनोख्या पद्धतीने सुरू आहे. या संत्संगमध्ये ध्वनिप्रदुषण होऊ नये यासाठी स्वत:हून दक्षता घेतली जाते.

Updated: Oct 22, 2017, 03:13 PM IST
सत्संगमध्ये हेडफोन घालून ध्वनी प्रदुषणावर मात title=

मुंबई : वाढत्या ध्वनी प्रदुषणावरून न्यायालयानेच कान उपटल्यावर यंदाच्या दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीला काहीसा चाप लागला. पण, उल्हासनगरमध्ये एक सत्संग मात्र अनोख्या पद्धतीने सुरू आहे. या संत्संगमध्ये ध्वनिप्रदुषण होऊ नये यासाठी स्वत:हून दक्षता घेतली जाते.

हा सत्संगचे वैशिष्ट्य असे की, या सत्संगात भाविकांना चक्क हेडफोन वाटण्यात येतात. उल्हासनगरच्या गोल मैदानात सप्टेंबर महिन्यापासून ४० दिवस अमृत वेली परिवाराचा हा सत्संग चालतो. मागील अनेक वर्षांपासून पहाटे पावणेचार ते पाच या काळात हा सत्संग चालतो. सत्संग चालत असलेल्या मैदानाच्या चारही बाजूंना रहिवासी भाग आहे. त्यामुळे सत्संग असलेल्या ठिकाणी जर स्पीकर्स लावले तर, ध्वनिप्रदुषण होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे सत्संगच्या आयोजकांनी यावर नामी उपाय शोधला.

स्पीकर्समुळे होणारे ध्वनिप्रदुषण टाळण्यासाठी यंदाच्या वर्षीपासून या सत्संगात खास हेडफोन्स तयार करण्यात आलेयत. त्यामुळे हेडफोनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या या सत्संगमुळे भक्तीचा मार्गही साधला जातो. तसेच, ध्वनिप्रदुषणालाही आळा बसतो. या उल्लेखनीय उपक्रमाची परिसरात नेहमीच चर्चा असते.