अमित शहांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे गांधीनगरला जाणार

उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होणार आहे.

Updated: Mar 29, 2019, 10:18 AM IST
अमित शहांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे गांधीनगरला जाणार title=

मुंबई: शिवसेना आणि भाजप यांच्यात युती झाल्यानंतर आता दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून आमच्यात कोणताही मनभेद नसल्याचा संदेश वारंवार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेणेकरून आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांना एकमेकांच्या मतपेढीचा फायदा होईल. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गांधीनगरला जाणार आहेत. भाजपचे अमित शहा आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होणार आहे. त्यासाठी अमित शहा यांनी गुरुवारी रात्री उद्धव यांना फोन करून गांधीनगरमध्ये उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. उद्धव ठाकरे यांनीही कोणतेही आढेवेढे न घेता हे आमंत्रण स्वीकारले. 

यापूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी गांधीनगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. ९१ वर्षीय लालकृष्ण आडवाणी १९९८ पासून गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून निवडून येते होते. आता मात्र अमित शाह या मतदारसंघातून आपले नशिब आजमावणार आहेत. अमित शाह पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात असल्याने त्यांना प्रचारात कोणतीही कसूर राहणार नाही, याची काळजी घेत आहेत. त्यामुळे अमित शहा यांच्या उद्याच्या रोड शो मध्ये उद्धव यांच्यासह एनडीए आघाडीतील अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. उद्धव आणि अमित शहा यांच्या या दिलजमाईमुळे शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते एकदिलाने लढतील, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

२०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने शिवसेनेशी काडीमोड घेतला होता. या निवडणुकीत दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर शेलक्या भाषेत टीकाही केली. उद्धव ठाकरे यांनी तर अमित शहा यांना अफजलखान म्हणून संबोधले होते. यानंतरच्या काळातही शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील भाजप नेत्यांना वारंवार लक्ष्य करण्यात आले होते. भाजपकडूनही या टीकेला जशास तसे प्रत्युत्तर दिले जात होते. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये कमालीचे वितुष्ट निर्माण झाले होते. परिणामी आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय द्वंद्व पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, मतविभाजनचा फटका बसण्याची लक्षात घेऊन शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र आले होते.