मुंबई : Deepak Kesarkar on Uddhav Thackeray : अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणात युवा नेते आदित्य ठाकरे यांची बदनामी केली गेली. यात भाजपचे नेते आणि मंत्री नारायण राणे यांचाही सहभाग होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर ही वस्तुस्थिती घालून राणे काय बोलतायत हे सांगितले. त्यांनीही (मोदी) प्रतिसाद दिला. त्यानंतर मोदी आणि ठाकरे यांच्यात संवाद सुरु झाला. नंतर त्यांची भेट झाली. मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार होते, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला.
मोदी आणि ठाकरे यांच्याच संवात सुरु होता. त्याचवेळी नंतर 12 आमदारांचे निलंबन झाले. नंतर नारायण राणे यांना केंद्रात घेतले गेले. यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले. ही गोष्ट दोनतीन लोकांना माहिती होती. त्यात रश्मी ठाकरे याही होत्या. एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवा, आपण एकत्र येवू, असे उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्याला सांगितले.पण भाजप तयार झाली नाही, असा दावा दीपक केसरकर यांनी केला आहे. मी जे बोललो ते सर्व सत्य आहे. यातील एकही शब्द खोटा असेल तर मी सार्वजनिक जीवनातून निवृत्त होईन, असे केसरकर म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तांतराबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावनी सुरु आहे. यावर दीपक केसरकर यांनी सावध भाष्य केले आहे. पक्षांतर्गत लोकशाही असावी की नाही हेही या निकालावरुन समजेल. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ झाला तरी चालेल, पण सर्वोच्च न्यायालयाचा आदर राखणं गरजेचे आहे आणि तो आमच्याकडून राखला जातोय. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार केला नाही. सोमवारी अंतरीम आदेश येईल आणि त्यानंतर विस्तार होईल, असे दीपक केसरकर म्हणाले.
तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. बहुसंख्य आमदार त्यांच्या मतदारसंघात असल्यामुळे बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.