मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीला एकामागून एक धक्के बसत आहेत. आता आणखी एक मोठा धक्का बसला असून मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतही (Mumbai District Central Co-operative Bank Ltd) सत्तेचे फासे पलटले आहेत. गेल्या निवडणूकीत शिवसेना आणि राष्ट्रवाती काँग्रेसने एकत्र येत भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांची अध्यक्षपदाची संधी हिसकावून घेतली होती.
पण सहा महिन्यातच चित्र पालटलं. प्रवीण दरेकर यांची मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर मुंबई बँकेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. बॅंकेचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आणि उपाध्यक्ष विठ्ठल भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही दोन्ही पदे रिक्त झाली होती
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्टवादी काँग्रेसने भाजपाला शह दिला होता. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसकजे एकूण 11 संचालक होते, तर भाजपकडे 9 संचालक होते. त्यामुळे महाविकास आघाडीकडे संख्याबळ जास्त होतं. त्यामुळे महाविकास आघाडीचे सिद्धार्थ कांबळे हे विजयी झाले होते, त्यांनी भाजपच्या प्रसाद लाड यांचा पराभव केला होता.
काय आहे प्रकरण?
मुंबई बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही प्रवर्गावतून निवडून आले होते. पण मजूर नसतानाही निवडणूक लढवून प्रवीण दरेकर यांनी सरकार आणि ठेवीदारांची फसवूणक केल्याचा आरोप करत आपचे धनंजय शिंदे यांनी दरेकर यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवलं होतं.