मुंबई : शिवसेनेने स्वबळाचा नारा दिलाय. त्यातच आता पुन्हा शिवसेना मराठीचा मुद्दा उचणार असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत. त्यामुळे मराठीच्या मुद्दयावर शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मूळ मराठी नावे बदलण्यासाठी घाट घालण्यात येत आहे. ही मराठी नावे बदलण्यास विरोध करत मूळ नावे मराठीत करण्यासाठी ३० जूनपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे त्यानंतर शिवसेना काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, २००८ मध्ये मराठीचा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उचलून धरल्यानंतर त्यांना मोठया प्रमाणावर जनसमर्थन मिळाले होते. त्यामुळे पुन्हा मराठीच्या मुद्द्यावर शिवसेना वळल्याचे बोलले जात आहे.
आज मुंबईत शिवसेनेची बैठक झाली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या नगरसेवकाना महत्त्वाच्या सूचना केल्या. त्यात मराठी पाट्यांचा मुद्दा आहे. मराठीच्या मुद्दयावर शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. शिवसेनेने मूळ नावे मराठीत करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत दिली आहे. दिलेल्या मुदतीत मराठीत नावे केली नाहीत तर पाटयांना काळे फासण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना दिले आहेत.
मराठी पाटयांचा मूळ मुद्दा शिवसेनेचा आहे. शिवसेनेने स्थापनेच्यावेळी मराठी पाटयांचा विषय हाती घेतला होता. मध्यंतरी मनसेने हा मुद्दा हायजॅक करत खळ्ळ-खट्याक सुरु केले होते. त्यानंतर अनेक दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लागल्याचे दिसून आहे. त्यामुळे मराठीचा मुद्दा मनसेने हायजॅक केल्याने शिवसेनेची कोंडी झाली होती.
दरम्यान, मुंबई विकास आराखडा मराठी भाषेत देण्यासाठी प्रशासनाकडे आग्रही मागणी करा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. काही विकासक आपल्या प्रकल्पांच्या जाहिरातीत मुंबईतील जागांची नावं मुद्दाम बदलत आहेत. न्यू कफ परेड, अप्पर वर्ली, अप्पर जुहू याठिकाणांची नावे बदलण्याचा घाट आहे. नाव बदलण्याचा हा घाट महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्या. विकासक ऐकत नसेल तर प्रसंगी विकासकला शिवसेनेच्या भाषेत उत्तर द्या, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिवसेना अधिक आक्रमक होणार असल्याचे संकेत मिळालेत.
दरम्यान, शिवसेनेने आगामी निवडणुकीची तयारी सुरु केलेय. त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जात आहे. तसेच मुंबई पदवीधर मतदार संघ आणि मुंबई शिक्षक मतदार संघ निवडणुकीतील मतदार हे आपले यापुढच्या निवडणुकीतीलही मतदार आहेत. आपापल्या विभागातील या मतदारांची यादी तयार करून त्यांच्याशी चांगला संपर्क आणि संवाद ठेवा, असेही उद्धव यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलेय.