पावट्यांना घरी बसवायची वेळ आलीय, उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार

'लाल बावटे आणि शिवसेनेचं जुनं नातं जगजाहीर आहे... पण हे जे काही पावटे बसले आहेत... त्यांना बदलायची गरज आहे... त्यांच्याजागी लायकीची माणसं आणण्याची गरज आहे' असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी मोर्चा आणि आंगणवाडी सेविकांना आपला पाठिंबा जाहीर केलाय.

Updated: Mar 23, 2018, 02:24 PM IST
पावट्यांना घरी बसवायची वेळ आलीय, उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार  title=

मुंबई : 'लाल बावटे आणि शिवसेनेचं जुनं नातं जगजाहीर आहे... पण हे जे काही पावटे बसले आहेत... त्यांना बदलायची गरज आहे... त्यांच्याजागी लायकीची माणसं आणण्याची गरज आहे' असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी मोर्चा आणि आंगणवाडी सेविकांना आपला पाठिंबा जाहीर केलाय.

गुरुवारी, विधानसभेत आंगणवाडी सेविकांना 'मेस्मा' कायद्यांतर्गत आणलं जाणार नाही, अशी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्वाही दिल्यानंतर आंगणवाडी सेविकांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

यावेळी, 'मेस्मा' स्थगित केला असला तरी अजूनही मी पूर्ण समाधानी नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

'मी लाल बावट्याचा रंग पाहिला नाही...'

शेतकरी मोर्चाला आपला पाठिंबा दर्शवताना 'लाल बावटा आणि शिवसेनेचं नातं जगजाहीर आहे... तरीही तुम्ही शिवसेना भवनात आलात... शेतकऱ्यांच्या मोर्चालाही मी उघड पाठिंबा दिला... एकनाथ शिंदे आणि दादा भुसे या मंत्र्यांना मी थेट चालत येणाऱ्या शेतकऱ्यांना भेटायला पाठवलं... त्यांना मदत करायला सांगितलं... त्यावेळी मी शेतकऱ्यांच्या 'लाल बावट्या'चा रंग पाहिला नाही... तर मी त्यांच्या चालत आलेल्या पायाला लागलेल्या रक्ताचा लाल रंग पाहिला...' असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

'तान्ह्या मुलांमधलं स्टार्टअप पाहा'

'स्टार्टअप काय फक्तं बिझनेसमध्येच पाहायचा का...? या तान्ह्या लहान मुलांकडेच स्टार्टअप म्हणून कधी पहाणार...? ही आपल्या देशाची खरी ताकत आहे... तीच कमकुवत होतेय... मला गेल्या तीन - साडे तीन वर्षांचा एक तरी सरकारचा असा निर्णय दाखवा, जो लोकांसाठी सकारात्मक होता आणि त्याला मी विरोध केला... हे मी अजिबात श्रेयासाठी केलेलं नाही... तुम्ही मला मतं द्याल अथवा नाही पण मी तुम्हाला मदत करणारच... मला फक्त तुमचे आशिर्वाद द्या' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.