मुंबई : राज्यातल्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. मुंबईतल्या सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी ही खलबतं सुरु आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आदित्य ठाकरे आणि संजय राऊतही उपस्थित आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात उद्या भेट होणार होती, पण अचानक उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला पोहोचले. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीचे नेते आग्रही आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये फक्त २ जागांचाच फरक आहे. त्यामुळे शिवसेनेला पूर्ण ५ वर्ष मुख्यमंत्रिपद मिळणार? का पहिले अडीच वर्ष शिवसेनेला आणि पुढची अडीच वर्ष राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळणार? हे पाहणं औत्सुक्याचं आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाबाबत ही भेट होत असण्याची शक्यता आहे.
आजच दिल्लीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्तास्थापनेची चर्चा पूर्ण झाली. या चर्चेत सगळ्या मुद्द्यांवर एकमत झाल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. दिल्लीतल्या बैठका संपल्यानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मुंबईला रवाना होणार आहेत. उद्याच काँग्रेस त्यांच्या विधीमंडळ गटनेत्याची निवड होणार आहे.
मुंबईमध्ये आल्यानंतर निवडणुकीत आम्हाला साथ देणाऱ्या घटकपक्षांसोबत चर्चा करु. ही चर्चा झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेसोबत बैठक घेऊन चर्चा करतील. ही चर्चा पूर्ण झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन किमान समान कार्यक्रम आणि खातेवाटपाबाबत माहिती दिली जाईल, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
उद्याच महाविकासआघाडी सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. उद्या पवार आणि उद्धव ठाकरे भेट होऊ शकते. त्याआधी सकाळी १० च्या सुमाराला शिवसेनेची बैठक होणार आहे, त्यानंतर दुपारी आघाडीच्या मित्रपक्षांची बैठक होणार आहे. त्यानंतर महाविकासआघाडीचे नेते सत्तास्थापनेचा दावा करायला जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्षपदावर दावा करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.