विरारमध्ये विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू, सहा जण जखमी

Electrocution death in Virar: विरार पूर्व येथे आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला लोखंडी रॉडवर फडकवलेल्या ध्वजाचा ट्रान्सफॉर्मरला स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झालेत. मिरवणूक काढल्यानंतर घरी परत असताना मिरवणूक वाहनावर बसवलेल्या लोखंडी रॉडवर ध्वज फडकवण्यात आला होता. याचा स्पर्श झाल्याने ही दुर्घटना घडली.

Updated: Apr 14, 2023, 10:24 AM IST
विरारमध्ये विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू, सहा जण जखमी title=

Electrocution Death in Virar: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 132 वी जयंती आहे. या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबई जवळील विरारमध्येही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाच्यावेळी एक दुर्घटना घडली. आंबेडकर जयंतीच्या मिरवणूक काढण्यात येत होती. मिरवणुकीनंतर घरी परतणाऱ्यांच्या गाडीतील काही जणांना विजेचा धक्का लागला. यावेळी विजेच्या धक्क्याने सहा जण होरपळलेत. यात दोघांचा जागीत मृत्यू झालाय तर तिघे गंभीर जखमी झालेत. विरारमधील मनवेल पाडा परिसरात ही दुर्घटना घडली. 

रुपेश सुर्वे आणि सुमित सूत अशी या मृत तरुणांची नावे आहेत. रात्री साडेदहा वाजता मिरवणूक संपल्यानंतर कार्यकर्ते घरी परतत होते. त्यावेळी मिरवणुकीच्या वाहनावर सहा जण उभे होते. वाहनावरील लोखंडी रॉड जवळच्या ट्रन्सफॉरमरच्या संपर्कात आल्याने या सर्वांना विजेचा जोरदार धक्का बसला त्यात सहा जण होरपळले. 

 या दुर्घघटनेत गंभीर जखमी झालेल्या इतर तिघांना तातडीने मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर दोघांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर नालासोपारा पूर्वमधील नागीनदासपाडा येथील नागरी रुग्णालयात आणि रेडियंट रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती देण्यात आली.

दुर्घटनेची माहिती मिळताच अनेकांनी रुग्णालयात जखमींना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले होते. विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळे सांगितले की, या दुर्घटनेची चौकशी करण्यात येत आहे.