...तर डॉक्टरांवर कारवाई करणार; मुंबई महापालिकेचा डॉक्टरांना इशारा

महापालिकेअंतर्गत येणाऱ्या रूग्णालयांमध्ये शिकवणाऱ्या डॉक्टरांना खाजगी प्रॅक्टिस करण्यावर बंदी घालता येणार नाही. 

Updated: Jul 31, 2021, 08:28 AM IST
...तर डॉक्टरांवर कारवाई करणार; मुंबई महापालिकेचा डॉक्टरांना इशारा title=

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या रूग्णालयांमध्ये शिकवणाऱ्या प्रोफेसर आणि डॉक्टरांसाठी पालिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. पालिका प्रशासानाच्या म्हणण्याप्रमाणे, महापालिकेअंतर्गत येणाऱ्या रूग्णालयांमध्ये शिकवणाऱ्या डॉक्टरांना खाजगी प्रॅक्टिस करण्यावर बंदी घालता येणार नाही. मात्र कामाच्या वेळेत या डॉक्टरांना ड्युटीवर हजर असणं बंधनकारक असणार आहे. 
 
मुंबई महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये शिकवण्याचं काम करणाऱ्या डॉक्टरांना खासगी व्यवसायाला सरसकट बंदी घालता येणार नाही. मात्र आपल्या नियमित ड्युटीच्या वेळी गैरहजर राहता कामा नये. असं आढळून आल्यास कारवाई करण्यात येण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकवणाऱ्या डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिस करण्यास परवानगी आहे. यामध्ये खासगी वैद्यकीय व्यवसाय न करणाऱ्या डॉक्टरांना मूळ वेतनावर 35 टक्के ‘व्यवसायक रोध’ भत्ता दिला जातो. या भत्त्यात वाढ झालेली असल्याने खासगी सेवा करण्याची परवानगी रद्द करावी अशा ठरावाची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी मांडली होती. 

पालिकेच्या डय़ुटीच्या वेळेतही हे डॉक्टर खासगी सेवा करत असल्याचं आढळल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. यावर पालिका प्रशासनाने आरोग्य समितीचा अभिप्राय देताना आपली भूमिका स्पष्ट केलीये.

पालिका रुग्णालयातील डॉक्टरांची उपस्थितीदेखील आता बायोमेट्रिक पद्धतीने नोंदवली जाते. डॉक्टरांना सकाळी 9 ते 4 या वेळेत संबंधित रुग्णालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. खासगी व्यवसाय करण्याचा पर्याय स्विकारणाऱ्या डॉक्टरांचं प्रमाण तुलनेने कमी आहे. त्यामुळे या सवलतीचा गैरवापर होणार नाही यासाठी रुग्णालय प्रशासन दक्ष असते असे प्रशासनाकडून नमूद करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे डॉक्टर डय़ुटीच्या काळात रुग्णालयात हजर नसल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय. त्याचबरोबर खासगी व्यवसाय करण्याची परवानगी नाकारल्यास विशेषकृत आणि अतिविशेषकृत डॉक्टर स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय स्वीकारण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा परिणाम रुग्णसेवेसह शैक्षणिक सेवांवरही होऊ शकतो.