मुंबई : ‘कोविड – १९’ या साथ रोगाला आळा घालण्यासाठी राज्यभरात राबविण्यात येणारी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यास आजपासून प्रारंभ झाला आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात व्यापकपणे व सर्व स्तरावर ही मोहीम राबविली जाणार असून या अंतर्गत मुंबईतील सुमारे ४० लाख घरांशी संपर्क केला जाणार आहे. तसेच या मोहिमेंतर्गत कोविड विषयक घ्यावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देखील घरोघर जाऊन देण्यात येणार असून त्यासोबतच एक माहिती पत्रकही घरोघरी देण्यात येणार आहे.
या अनुषंगाने प्राथमिक वैद्यकीय पडताळणी करणे, कुटुंबातील सदस्यांची प्राथमिक माहिती घेणे आणि कोविड विषयक प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देणे, यासाठी आपल्या घरी येणाऱया महापालिकेच्या चमुला आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात आज एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीला मार्गदर्शन करताना महापालिका आयुक्तांनी महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सूक्ष्मस्तरीय नियोजन करण्याचे निर्देश यापूर्वीच दिले होते. यानुसार आजच्या बैठकीदरम्यान महापालिका आयुक्तांनी विभाग स्तरावर व विविध खात्यांच्या स्तरावर करण्यात येत असलेल्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने मनुष्यबळ व्यवस्थापन, प्रशिक्षण, कोविडविषयक पडताळणी, सर्वेक्षणातून उपलब्ध होणाऱया माहितीचे विश्लेषण इत्यादी बाबींच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. तसेच या मोहिमेच्या अनुषंगाने करण्यात येणाऱया जनजागृतीविषयक बाबींचाही आढावा महापालिका आयुक्तांनी घेतला.
महापालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात आज संपन्न झालेल्या आढावा बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) श्री. संजीव जयस्वाल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी यांच्यासह सह आयुक्त, उप आयुक्त, कार्यकारी आरोग्य अधिकारी, सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख इत्यादी अति वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आज संपन्न झालेल्या नियोजन विषयक आढावा बैठकीत चर्चिल्या गेलेल्या बाबी व मोहीम अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुद्देनिहाय माहिती पुढीलप्रमाणेः-
· बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात सुमारे ४० लाख घरे आहेत. मोहिमेदरम्यान या प्रत्येक घरापर्यंत संपर्क साधला जाणार आहे.
· प्रत्येक घरापर्यंत संपर्क साधण्यासाठी सुमारे ५ हजार चमू कार्यरत असणार आहेत. यापैकी प्रत्येक चमुमध्ये ३ व्यक्तिंचा समावेश असणार असून त्यापैकी १ व्यक्ती ही महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याची असेल. तर उर्वरित २ व्यक्ती या स्वयंसेवक असणार असून त्यात एक महिला व एका पुरुषाचा समावेश असेल.
· वरीलनुसार कामाच्या अनुषंगाने आवश्यक ते मनुष्यबळ व्यवस्थापन हे प्रामुख्याने महापालिकेच्या विभाग कार्यालयांद्वारे केले जाणार आहे.
· ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेचे काम सोपविण्यात आलेल्या १५ हजार व्यक्तिंना महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाणार आहे.
· मोहीम कालावधी दरम्यान प्रत्येक चमू ही दररोज सुमारे ५० कुटुंबांशी संपर्क साधेल. तसेच संपूर्ण मोहीम कालावधी दरम्यान प्रत्येक कुटुंबाशी साधणारपणे २ वेळा संपर्क साधला जाणार आहे.
· प्रत्येक चमुने घरी संपर्क साधताना सुरक्षित अंतर ठेऊन घरातील सदस्यांची प्राथमिक माहिती नोंदवून घ्यायची आहे.
· चमुद्वारे करण्यात येणाऱया प्राथमिक पडताळणी दरम्यान शारीरिक तापमान, शरीरातील प्राणवायुची पातळी (Oxygen Saturation) आदी बाबी तपासल्या जाणार आहेत. तापमान तपासताना योग्य ते शारीरिक दूरीकरण असावे, यासाठी प्रत्येक चमुकडे ‘थर्मल गन’ देण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्राणवायुची पातळी मोजण्यासाठी ‘ऑक्सिमीटर’ देखील असणार आहे.
· वरीलनुसार प्राथमिक पडताळणी दरम्यान ज्या व्यक्तिंना कोविडची लक्षणे आढळून येतील, त्यांना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
· ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी (Co-morbidity) असणाऱया घरातील सदस्यांची नोंद घेतली जाणार आहे.
· कोविड विषयक प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मुद्देनिहाय माहिती देणारे पत्रक सर्वेक्षणादरम्यान प्रत्येक घरी देण्यात येणार आहे. यामध्ये वैयक्तिक स्तरावर घ्यावयाच्या खबरदारीच्या उपाययोजनांसोबतच सोसायटी, व्यवसायिक इत्यादींच्या स्तरावर घ्यावयाच्या उपाययोजनांची माहिती असणार आहे.
· ज्या कुटुंबांना महापालिकेच्या चमुने भेट देऊन त्यांची आवश्यक ती पडताळणी केली आहे आणि संबंधित माहिती घेतली आहे; अशा घरांवर मोहिमेचे स्टिकर लावले जाणार आहे. जेणेकरुन, मोहिमेंतर्गत सदर घराचे सर्वेक्षण झाले असल्याचे निश्चित होणार आहे.
· या मोहिमेदरम्यान प्रत्येक कुटुंबाशी संपर्क साधताना जी माहिती मिळेल, ती सर्व माहिती राज्य सरकारद्वारे या मोहिमेसाठी तयार करण्यात आलेल्या ऍण्ड्रॉईड आधारित मोबाईल ऍपमध्ये जतन केली जाणार आहे. यामुळे उपलब्ध होणाऱया सर्व माहितीचे जलद गतीने विश्लेषण करणे शक्य होणार आहे. परिणामी, कोविड नियंत्रण विषयक उपाययोजनांची अंमलबजावणी देखील जलद गतीने करणे शक्य होणार आहे. हे ऍप कसे वापरावे, याबाबतची प्रात्यक्षिकासह माहिती चमू सदस्यांना प्रशिक्षणादरम्यान दिली जाणार आहे, असे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे सांगण्यात आले.