झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया : संजय राऊत

माजी नौदल अधिकाऱ्यावर झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती,  राऊत यांनी म्हटले आहे.

Updated: Sep 12, 2020, 10:02 PM IST
झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया : संजय राऊत  title=
संग्रहित छाया

मुंबई : माजी नौदल अधिकाऱ्यावर झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती.  अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार झाला तर संयमाचा बांध फुटतो.  हे कायद्याचे राज्य, कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही.  हल्लेखोरांवर कारवाई केलीय. राजकीय भांडवल करू नये, असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना दिला आहे. 

महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कायदा हातात कोणीही घेऊ नका. ते खपवून घेतले जाणार नाही. हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. मुंबईत काल एका माजी नौदल अधिकाऱ्यावर हल्ला झाला. त्या अधिकाऱ्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत प्रसारित केलेले व्यंगचित्र बदनामीकारक असले तरी त्याच्यावर झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची संतप्त आणि तितकीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

हल्लेखोरांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. विरोधी पक्षाने या घ टनेचे राजकीय भांडवल करावे हे दुर्दैव आहे. संयम दोन्ही बाजूंनी पाळला गेला पाहिजे. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री या घटनात्मक पदांबाबत टोकाची टीका करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार झाला तर लोकांच्या संयमाचा बांध तुटतो. म्हणून सगळ्यांनीच जबाबदारीने, एकमेकांचा आदर ठेवून वागण्याची ही वेळ आहे. समाजात अशांतता आणि तणाव निर्णाण होऊ न देणे हे सत्ताधाऱ्यांइतकेच विरोधकांचेही कर्तव्य आहे, असे राऊत यांनी ट्विट करताना म्हटले आहे.