Sushama Andhare : "तुझ्या बापाला आम्ही जवळून ओळखतो, त्याची..."; सुषमा अंधारेंच्या मुलीसाठी जवळच्या व्यक्तीचे खास पत्र

Sushama Andhare : सुषमा अंधारे काय चीज आहे सविस्तरपणे मांडणार आहे, असा इशारा त्यांच्या विभक्त पतीने दिला होता

Updated: Nov 16, 2022, 02:16 PM IST
Sushama Andhare : "तुझ्या बापाला आम्ही जवळून ओळखतो, त्याची..."; सुषमा अंधारेंच्या मुलीसाठी जवळच्या व्यक्तीचे खास पत्र title=

मुंबई : ठाकरे गटात (Thackery Group) प्रवेश केल्यापासूनच सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण केली आहे. खासदार संजय राऊत यांच्यानंतर सुषमा अंधारे या विरोधकांवर जोरदार टीका करत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुषमा अंधारे यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आल्या आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती अॅड. वैजनाथ वाघमारे (vaijnath waghmare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटात प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशानंतर वैजनाथ वाघमारे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे आणि ते पती-पत्नीच्या नात्यातून वेगळे का झाले याची कारणे सांगितली आहेत. तसेच शिंदे गटात प्रवेश करताच त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावरही टीका केली. (Vaijnath Waghmare criticized Sushma Andhare)

सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमच्या नात्याला खरा तडा गेला. म्हणून आम्ही वेगळे झालो असे वैजनाथ वाघमारे यांनी म्हटलं आहे. 'सुषमा अंधारेंनी एका मंत्र्याला अश्लील आणि अश्लाघ्य पद्धतीने त्रास दिला. मी त्याच गावात जाऊन पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे काय चीज आहे, कोठून आल्या, काय झालं, कोणी आणलं हे सगळं सविस्तरपणे मांडणार आहे,' असा इशारा वाघमारे यांनी दिला होता. 

तुझ्या आईने या बलाढ्य साम्राज्याशी लढायचं ठरवलंय - सुषमा अंधारे

त्यानंतर सुषमा अंधारे यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे या सर्व प्रकरणावरुन आपल्या लेकीसाठी भावना व्यक्त केल्या होत्या. "बाळा,  तुझ्या आईने जुन्या मळवाटेने जायचं नाकारले आणि नवीन पायवाट घडवायची ठरवली आहे. यात बऱ्याचदा पाय रक्ताळणार आहेत.. बेहत्तर.. पण तुझ्या आईने या बलाढ्य साम्राज्याशी लढायचं ठरवलंय..!" असं म्हणत सुषमा अंधारे यांनी त्यांच्या लेकीसोबतचा फोटो शेअर होता. याबाबत आता सुषमा अंधारे यांच्या भावानेदेखील त्यांना पाठिंबा दिला. तसेच त्यांच्या भाचीसाठी त्यांनी एक पत्र लिहीलं आहे.

सुषमा अंधारे यांचे बंधू प्राध्यापक शिवराज बांगर पाटील यांनी भाची कबीरासाठी पत्र लिहीलं आहे. सुषमा अंधारे यांनी ही पोस्ट त्याच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केली आहे.

काय म्हटलंय या पत्रात?

प्रिय, कबीरा सुषमा अंधारे हिस....., बाळा मी ना तुझ्या आईच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, ना तुझ्या आईचा. परंतु तुझी आई ज्या पद्धतीने एका नाकारलेल्या व्यवस्थेतून बाहेर पडून स्वतःचे व्यक्तिमत्व आणि अस्तित्व या महाराष्ट्रामध्ये निर्माण करत आहे "ही खरंच आम्हा भटक्याच्या लेकरासाठी अभिमानाची गोष्ट आहे". मी तुझ्या आईच्या अनेक भूमिका पाहिल्या तिने कधीच आपल्या तत्त्वासोबत तडजोड केलेली मला आज पर्यंत जाणवली नाही, ती शब्दात कुणाला सापडत नाही, की सीबीआय, ईडी  तिचं काय बिघडवू शकत नाही. बाबासाहेबांच्या  विचाराची धगधगती मशाल घेऊन महाराष्ट्रातील राजकिय  जळमट जाळण्यासाठी निघाली आहे. ज्या ज्या वेळेला आमच्यासारखे चळवळीतील लोक अडचणीत आले तेव्हा ती आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत आली आहे. आज तिच्यावर वैयक्तिक हल्ले करण्याची रणनीती आखली जात आहे. त्यांच्या भात्या मधील शेवटचे शस्त्र म्हणजे "तुझा बाप" हेच अस्त्र या व्यवस्थेने खूप लवकर तिच्यावरती वापरलेय. तुझ्या बापाला ही आम्ही जवळून ओळखतो त्याची राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक उंची आम्हाला माहित आहे. परंतु "केवळ सुषमा अंधारेचा पती" म्हणून काल मुख्यमंत्र्यांच्या शेजारी उभा राहण्याचा बहुमान मिळाला. तू एक विचार कर आज जर तुझा बाबा सुषमा अंधारेचा पती नसता आणि तो एखाद्या शेतामध्ये काम करणाऱ्या सामान्य भगिनीचा पती असतात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांने त्याला बोलावलं असतं का? असा सवाल या पत्रामध्ये विचारण्यात आला आहे.

तुझी आई एक रणरागिणी आहे

"आम्ही आनंदी असतो कधी काळी ज्या जोडीदाराने आम्हाला नाकारलेले आहे आज तेच आमच्या यशाच्या कडेला धरून स्वतःचं अस्तित्व निर्माण करू पाहतात आणि लोक त्यांना केवळ आमचे जोडीदार म्हणून जवळ करतात. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तुम्हाला संपवण्यासाठी कुठलीच बाजू शिल्लक नसते त्यावेळेला त्याच्या वैयक्तिक जीवनाचा, त्याच्या वैयक्तिक प्रश्नांचा बाजार हे राजकीय मंडळी मांडतात या सर्व घटना मी स्वतः सहन केल्या आहेत. आज ज्या धिराने आणि समर्थपणे तुझी आई सगळ्या गोष्टीला सामोरे जात आहे, निश्चितच बहीण म्हणून आम्हाला तिचा अभिमान आहे. येणारा काळ हा जेवढा संधीचा आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त संकटांचा आहे. तुझ्या आईच्या आयुष्यातील शेवटचे सुख आणि दुखः व्यक्त करण्याचे व्यासपीठ तू आहेस. ज्या कष्टाने तुला ती वाढवत आहे, उभा करत आहे याची जाणीव तुला असायला हवी म्हणून हा शब्द प्रपंच आहे. बाकी तुझी आई एक "रणरागिणी आहे" या नथी मधून केलेल्या वाराला ती कधीच भीक घालणार नाही, तिच्या लढ्यामध्ये आमच्यासारखे पक्ष संघटना सर्व सोडून, लाखो भाऊ पाठीशी उभा आहेत. फक्त तू तिची काळजी घे एवढीच तुझ्याकडून अपेक्षा," असे या पत्रात म्हटले आहे.