दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपावण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबतचा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णायानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घटनेने राज्यांना दिलेल्या अधिकाराला धक्का लागू नये, म्हणून तपास राज्याकडे असावा, अशी मागणी आम्ही केली होती. सीबीआयकडे तपास देण्यास विरोध केला नव्हता, असं अनिल परब म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरे यांचं नाव खराब करणं हा विरोधकांचा अजेंडा आहे. सरकार आले नाही म्हणून पोटशूळ उठला आहे. सरकार चांगलं चाललं आहे, त्यामुळे सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. विरोधक काय म्हणतात, यापेक्षा घटना काय म्हणते याला आम्ही महत्त्व देतो. याप्रकरणी राजकारण करणं एवढंच विरोधकांचं काम आहे, अशी टीका परब यांनी केली आहे.
आम्ही चौकशीला घाबरत नाही, कारण याप्रकरणाशी आमचा काही संबंध नाही. अनेक संकटांना सामोरं जात शिवसेना सत्तेत आली, संकटांना शिवसेना घाबरत नाही, अशा खोट्या संकटांना तर नाहीच, असं वक्तव्य अनिल परब यांनी केलं आहे. तसंच पार्थ पवारांनी केलेल्या सीबीआय चौकशीच्या मागणीबाबत तेच सांगू शकतील, ते सरकारचा भाग नाहीत, त्यामुळे त्यांच्या मागणीवर आम्ही प्रतिक्रिया देणार नाही, असं अनिल परब म्हणाले.
सीबीआयकडे तपास देण्यासाठी राज्याची परवानगी लागते किंवा न्यायालय ती परवानगी देते. न्यायालय अपवादात्मक परिस्थितीमध्ये प्रकरण सीबीआयला देते. यामध्ये घटनात्मक ढाच्याला धक्का लागला आहे का? याबाबत घटनातज्ज्ञांनी निकालाचा नीट अभ्यास करुन मत व्यक्त करावं, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली.