What Is Bornhan in Marathi : महाराष्ट्रात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मकर संक्रांतीचा सण हा खास करुन महिलांसाठी असतो असं म्हटलं जातं. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सुवासिनी महिला हळदीकुंकूचा कार्यक्रम करतात. त्यासोबत महाराष्ट्रात एक अनोखी प्रथा पाळली जाते. काही भागांमध्ये किंक्रात झाल्यानंतर रथसप्तमीपर्यंत लहान मुलांचं बोरन्हाण केलं जातं. विदर्भात या प्रथेला लहान मुलांची लूट किंवा बोरलूट असं म्हटलं जातं. ही परंपरा आजही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. काय आहे ही प्रथा आणि किती वर्षांच्या मुलांची बोरन्हाण करतात जाणून घेऊयात. (Makar Sankranti 2025 What Is Bornhan in Marathi importance scientific reasons items required for bornahan)
पौराणिक कथा यामागील जाणून घेऊयात. आख्यायिकामध्ये असं सांगितलं की, करी नावाच्या राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये म्हणून हा विधी करण्यात येतो. हा विधी सर्वप्रथम करी राक्षसापासून बचावासाठी बाळ गोपाळ कृष्णावर करण्यात आला होता. तेव्हापासून ही प्रथा सुरु झाली आहे. लहान मुलं हे कृष्णाचं रुप मानलं जातं. त्यामुळे करी राक्षसाची सावली आपल्या मुलावर पडू नये म्हणून बोरन्हाण करण्याची परंपरा सुरु झाली.
नववधूची पहिली मकर संक्रांत असली की, तिला हलव्याचे दागिने घातले जातात. तसंच बोरन्हाणच्या सोहळ्यात लहान मुलांना हलव्याच्या दागिन्यांनी नटवलं जातं. त्याचं औक्षण करुन त्याच्या डोक्यावरून बोर, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या आदी पदार्थ टाकले जातात. हे पदार्थ उपस्थित लहान मुलं लुटतात. या विधीला बोरन्हाण असं म्हटलं जातं.
या प्रथेमागे शास्त्रीय कारणही आहे. तर या बोरन्हाणमागे शास्त्रीय कारणही असं सांगितलं जातं की, जे समजल्यावर तुम्ही घरातील चिमुकल्याच बोरन्हाण कराल. मकर संक्रांत ही ऋतु बदलाची चाहुल आहे. लहान मुलांना या बदलत्या ऋतुचा त्रास होऊ नये आणि या ऋतुमधील फळं त्यांनी ख्यावीत म्हणून हा विधी केला जातो. मजा आणि मस्तीमध्ये लहान मुलं न खाणारी फळं या निमित्ताने खातात. 1 वर्षांच्या चिमुकल्यापासून 5 वर्षांच्या मुलांचं बोरन्हाण करतात. लहान मुलांचा कौतुक सोहळा आजकाल मोठ्या थाट्यामाट्यात केला जातो.
काळा पोशाख : या विधीसाठी मुलाला काळा पोशाख परिधान केला जातो. मुलीसाठी काळा फ्रॉक आणि मुलासाठी काळा कुर्ता ऋतूप्रमाणे काळा स्वेटर देखील घालू शकता.
औक्षणाचे साहित्य: बोरन्हाण करण्यापूर्वी औक्षण केले जाते. म्हणून तयारीत औक्षणाचे साहित्य लागते ज्यात ताटात हळद-कुंकु, तुपाचे किंवा तेलाचे निरांजन, सुपारी, सुवर्णमुद्रा, अक्षता, आणि कापूस अशा गोष्टीनी औक्षण केले जाते.
बोरन्हाणसाठी साहित्य: एका वाडग्यात बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, मुरमुरे मुख्य असते. या व्यतिरिक्त चॉकलेट आणि मुलांना आवडणारे नवीन-नवीन पदार्थांचा देखील सामील करता येतात.
घरात तुम्ही ज्या ठिकाणी बोरन्हाण करणार आहात ती जागा स्वच्छ करुन तिथे पाट किंवा चौरंग ठेवा. बाळाला नवीन काळ कपडे घालून त्यांना हलव्याचे दागिनी घाला आणि चौरंगावर बसवा. त्यानंतर चिमुकल्याच औक्षण करा. त्याचा डोक्यावरून बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा आणि कुरमुरे एकत्र करुन त्याचं बोरन्हाण करा आणि उपस्थितीत लहान मुलांना ते लुटण्यासाठी सांगा. बोरन्हाण मध्ये वापरण्यात येणारी फळं मुलं इतर वेळी खात नाहीत म्हणून बोरन्हाणच्या माध्यमातून ती फळं त्यांच्या पोटात जातात.
एक गोष्ट आवर्जून लक्ष द्या बोरन्हाण घालताना लहान मुलांना डोक्याला किंवा अंगाला लागू नये म्हणून काळजी घ्या. तुम्ही छान छोटीशी छत्री वापरु शकता. या बोरन्हाणंमध्ये तुम्ही चुरमुरे, लाह्या, छोटी बोरं, चिंचा, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, रंगीबेरंगी गोळ्या, हल्लीच्या लहान मुलांच्या आवडीचा विचार करून वेगवेगळी चॉकलेट्स, गोळ्या, बिस्कीटे वापरु शकता.
यावेळी म्हटलं जातं की, बाळावर असंच सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे. तो सुबत्तेत न्हाउ दे. कायम बाळगोपाळांनी घेरलेला म्हणजेच सर्वांचा लाडका होउ दे, असा हा लहान मुलांचा मकर संक्रांतीतील एक संस्कार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)