Jalgaon Crime: महाराष्ट्रातल्या विविध भागात मराठी माणसांवर अन्याय होण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. कुठे मराठी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं जातंय तर कुठे मराठी बोलल्यामुळे मारहाण केली जातेय. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे मराठीजनांमधून संताप व्यक्त केला जातोय. त्यात आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. जळगावमधील एमआयडीसीतील एका कंपनीत मराठी कामगारांवर अन्याय केला जात असल्याच्या प्रकार समोर आलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या घटनेची गांभीर्याने दखल घेतलीय.
जळगावच्या एमआयडीसी कंपनीतील परप्रांतीय व्यवस्थापक जाणूनबुजून मराठी कामगारांना तब्बल 2 महिन्यांपासूनचा पगार देत नसल्याचा प्रकार समोर आला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे यासंदर्भात तक्रार आल्यानंतर स्थानिक मनसे पदाधिकारी आक्रमक झाले.मनसे महानगराध्यक्ष विनोद शिंदे यांनी थेट कंपनीचे मॅनेजर यांच्या कानाखाली लगावल्याचा प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट कंपनीत जाऊन परप्रांती व्यवस्थापकाला जाब विचारत त्याचा कानशिलात लगावली.
कंपनीचा परप्रांतीय व्यवस्थापक 2 महिन्यांपासून पगार देत नाही. तसेच पार्सल पॅकिंगमध्ये मराठी मुलांवर चोरीचा आरोप करत असल्याची तक्रार कामगारांनी मनसे पदाधिकाऱ्यांकडे केली होती.
यानंतर मनेसे पदाधिकारींनी आपल्या स्टाईलमध्ये व्यवस्थापकाला जाब विचारला. या आक्रमक आंदोलनानंतर काही तासातच परप्रांतीय व्यवस्थापकाने मराठी कामगारांचा पगार खात्यावर जमा केल्याची माहिती मिळाली आहे.