मुंबई : Corona कोरोना व्हायरससंबंधी सोशल मीडियावर खोट्या बातम्या आणि अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा महाराष्ट्र सायबर सेलनं दिला आहे. सध्याच्या परिस्थितीत राज्यामध्ये विविध ठिकाणी कोरोनाची लागण झाल्याबाबतच्या खोट्या बातम्या सोशल मीडियावर पसरवल्या जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
कोरोनाविषयीच्या या सर्व अफवा आणि त्याचा नागरिकांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम पाहता आता याची गंभीर दखल घेत, सायबर सेलनं अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा दिला आहे. कोणत्याही प्रकारे Covis-19 विषयी अफवा पसरवणाऱ्यांच्या तक्रारी स्थानिक पोलीस ठाणं किंवा www.cybercrime.gov.in यावर नोंदवण्याचं आवाहनही सायबर सेलनं केलं आहे.
सायबर सेलकडून देण्यात आलेला हा आदेश पाहता आला सोशल मीडियावरुन तुमच्यापर्यंत येणारा किंवा आलेला कोणताही फॉरवर्डेड मेसेज दुसऱ्या कोणाला पाठवण्यापूर्वी विचार करा. शहानिशा न करता कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती पसरवली जाऊ नये यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे.
वाचा : कोरोनाची अफवा पसरविणाऱ्या दोघांना नाशकात अटक
गेल्या काही दिवसांपासून जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने भारत आणि महाराष्ट्रातही सर्वांमध्ये दहशतीचं वातावरण तयार केलं आहे. परिणामी याविषयी अनेक समज, गैरसमजही जनतेमध्ये पाहायला मिळत आहेत. ही परिस्थिती टाळून या व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय सातत्याने योजले गेले पाहिजेच यासाठी प्रशासनासह सर्वसामान्यांच्या सहकार्याचीही अपेक्षा असल्याचं आवाहन सध्या करण्यात येत आहे.