कोरोनाचे सावट : एसटी कर्मचाऱ्यांना मास्क पुरविण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी महामंडळ खबरदारीच्या उपाय योजना करीत आहे. 

Updated: Mar 17, 2020, 09:31 PM IST
कोरोनाचे सावट : एसटी कर्मचाऱ्यांना मास्क पुरविण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश  title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी महामंडळ खबरदारीच्या उपाय योजना करीत आहे. एसटी अविरत प्रवाशांच्या सेवेत कार्यरत असून ती अधिक सक्षमपणे कार्यरत राहावी तसेच प्रवाशांच्या संपर्कात एसटी महामंडळातील येत असलेल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी यांना दररोज मास्क पुरविण्यात यावे, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिले आहेत.

एसटी बसेसची तसेच बसस्थानकांचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता करणेबाबत यापूर्वीच परिवहन मंत्री परब यांनी निर्देश दिले आहेत. याप्रमाणे बसेस आणि बसस्थानकांची स्वच्छता करण्यात येत आहे. प्रवाशांच्या संपर्कात येणारे एसटी महामंडळाचे कर्मचारी उदा. वाहक, कंट्रोल कॅबिनमधील वाहतूक नियंत्रक व बसस्थानकातील वाहतूक पर्यवेक्षक, कॅश आणि इशूमधील कर्मचारी यांना कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने त्यांना दररोज डिस्पोजल मास्क पुरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, लोकांनी कोरोनाचा धोका ओळखून जबाबदारीने वागायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी कायदा करायची वेळ येता कामा नये. पुण्यातील दुकानदारांनी स्वयंस्फुर्तीने दुकाने बंद केलीत आहेत. तसाच पुढाकार सगळ्यांनी घेतला पाहिजे. प्रत्येकाची जबाबदारी आहे. राज्याच्या अन्य भागातील दुकानदारांनीही जीवनावश्यक गोष्टी वगळता इतर दुकाने बंद करावीत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

राज्यात कोरोनाचे ४१ रुग्ण, एकाची प्रकृती गंभीर, इतरांची प्रकृती स्थिर आहे.  बस-ट्रेन बंद करण्याचा निर्णय नाही. सध्या ट्रॅफिक कमी झाले आहे, बस-ट्रेन अत्यावश्यक सेवा असल्याने बंद केलेल्या नाहीत. अनावश्यक प्रवास टाळा, गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. नागरिकांनी शिस्त पाळली तर कठोर पावले उचलण्याची गरज नाही.  जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सोडून इतर दुकाने बंद ठेवा, असेही आवाहन करण्यात आले आहे. 

0