मुंबई : सोसायटीधारकांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी. तुम्हाला जर तुमच्या इमारतीचा पुनर्विकास करायचा असेल तर तुम्हाला बांधकाम व्यावसायिक किंवा विकासकाच्या मागे - मागे फिरण्याची गरज नाही. तुम्हीच तुमची नवी बिल्डिंग उभारू शकणार आहात.
सध्या अनेक ठिकाणी सोसायटी आणि बिल्डरांमध्ये वाद सुरू आहे. कारण इमारतीचा पुनर्विकास करायचा असेल तर सोसायटीधारकांना बिल्डरचं ऐकण्याशिवाय पर्याय नसतो. बांधकामाचा खर्च बिल्डरच करणार असल्यानं पुनर्विकासात बिल्डर देईल तितक्याच जागेवर सोसायटीधारकांना समाधान मानावं लागतं. पण बिल्डरांच्या कटकटीतून सोसायटीधारकांची सुटका होणारंय. कारण इमारतीच्या पुनर्विकासासाठी सोसायट्यांना कर्ज देण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेनं दिलीय. त्यामुळे आता सोसायटीच आपली इमारत नव्यानं बांधू शकणार आहे.
रिझर्व्ह बँकेच्या परवानीमुळे यापुढे सोसायट्यांना गृहकर्ज मिळू शकेल. बांधकाम, पुनर्विकास, इमारत दुरूस्ती या कारणांसाठी हे कर्ज देण्यात येईल. त्यामुळे पुनर्विकासासाठी सोसायटीधारकांना बिल्डरवर अवलंबून राहण्याची गरज नाही. सोसायटी स्वत:च बांधकाम करत असल्यानं वाढीव बांधकामाचा लाभ सभासदांना देण्याचा अधिकार हा सोसयटीकडेच राहील.
बऱ्याचदा बिल्डरमंडळी भुलथापा देऊन पुनर्विकासासाठी घेतलेल्या इमारतीचं काम अर्धवटच ठेवून देतात. तर अनेकदा वाढीव बांधकामात बिल्डर स्वत: जास्तीचा लाभ घेतो. पण रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानं सोसायट्यांना मोठा दिलासा मिळालाय. यामुळे बांधकामाचा खर्चही वाचेल आणि वाढीव बांधकामाचा योग्य वाटा सभासदांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.