दुकानदारांनो पाटी मराठीत केली का? नसेल तर तात्काळ बदला; अन्यथा तुमचं काही खरं नाही!

Marathi Patya News : दुकानांवरील नावांच्या पाट्या मराठीत करण्यासाठी 31 मे ची अंतिम मुदत आज संपणार आहे. मुदत देऊनही मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर यापुढे मुंबई महापालिका कारवाई करणार आहे. 

Updated: May 31, 2022, 08:52 AM IST
दुकानदारांनो पाटी मराठीत केली का? नसेल तर तात्काळ बदला; अन्यथा तुमचं काही खरं नाही! title=

मुंबई : Marathi Patya News : दुकानांवरील नावांच्या पाट्या मराठीत करण्यासाठी 31 मे ची अंतिम मुदत आज संपणार आहे. मुदत देऊनही मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर यापुढे मुंबई महापालिका कारवाई करणार आहे. (Mumbai: Shop names in Marathi first and capitals, says BMC) त्याशिवाय मद्यविक्री करणाऱ्या दुकानांनाही यापुढे गड किल्ले, महान व्यक्तींची नावं देता येणार नाहीत. राज्याच्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठी पाट्या अनिवार्य करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 

सर्व दुकानांची नावे इतर कोणत्याही भाषेत लिहिण्यापूर्वी प्रथम मराठीत आणि मोठ्या अक्षरात लिहावीत, असे बीएमसीने बुधवारी सांगितले. मराठी भाषेतील अक्षरांचा आकार (फॉन्ट साइज) इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांपेक्षा लहान नसावा, म्हणजेच मराठी फॉन्टचा आकार इतर भाषेपेक्षा मोठा असावा, असेही पालिकेने म्हटले आहे. 

त्याशिवाय, मद्याची दुकाने किंवा बार यांनी त्यांच्या साइनबोर्डवर प्रमुख व्यक्ती, ऐतिहासिक व्यक्ती किंवा किल्ल्यांची नावे वापरु नयेत, असे बीएमसीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास, महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (रोजगाराचे नियमन आणि सेवा शर्ती) अधिनियम, 2017 मधील तरतुदींनुसार संबंधित दुकान किंवा आस्थापनेच्या मालकावर कारवाई केली जाईल. 

बीएमसीचे हे पाऊल राज्य मंत्रिमंडळाच्या आधीच्या निर्णयानंतर आले आहे. या वर्षी महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (रोजगाराचे नियमन आणि सेवा शर्ती) अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली, ज्यामुळे 10 पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकाने आणि आस्थापनांना मराठी नावाच्या पाट्या लावाव्या लागतील. कायद्यानुसार मुंबईतील सर्व व्यापाऱ्यांना त्यांच्या दुकानांवर किंवा प्रतिष्ठानांवर प्रथम मराठी 'देवनागरी' लिपीत आणि नंतर इतर कोणत्याही भाषेत नावाच्या पाट्या प्रदर्शित करु शकतात, असे पालिकेने म्हटले आहे.