शिवसेना खासदारांची मातोश्रीवरील बैठक रद्द

शिवसेना खासदारांची बोलावण्यात आलेली बैठक रद्द करण्यात आली आहे. 

Updated: Dec 8, 2019, 12:02 PM IST
शिवसेना खासदारांची मातोश्रीवरील बैठक रद्द title=

मुंबई : शिवसेना खासदारांची बोलावण्यात आलेली बैठक रद्द करण्यात आली आहे. मातोश्रीवर आज ही बैठक होणार होती. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली होती. संसदेचं सुरु असलेलं अधिवेशन, त्यात मांडली जाणारी महत्त्वाची विधेयकं, राज्यातले विविध मुद्दे यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र अचानक ही बैठक रद्द का करण्यात आली याचं कारण मात्र कळू शकलेलं नाही.

भाजप आणि शिवसेनेतली युती तुटल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन राज्यात सत्ता स्थापन केली. राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर केंद्रातली सत्ता समीकरणंही बदलली आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मोदी सरकार काही महत्त्वाची विधेयकं आणण्याच्या तयारीत आहे. यावर रणनिती ठरवण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. 

गेल्या जवळपास महिनाभरापासून महाराष्ट्रात निर्माण झालेला सत्तेचा पेच सुटला. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार स्थापन झाले, तरी अद्याप खाते वाटप करण्यात आलेले नाही. सरकार स्थापनेचा तिढा सुटल्यानंतर कोणाला कोणते खाते यावर महाविकासआघाडीत एकमत झालेले नाही. त्यातच नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्यानंतर मंत्र्यांचे खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, अशी चर्चा आहे.

एकीकडे उद्धव ठाकरेंच्या मंत्र्यांना त्यांची खाती मिळालेली नसतानाच शिवसेनेने गृहमंत्रीपद हे उद्धव ठाकरेंकडेच असावं, अशी मागणी केली आहे. आजपर्यंत मुख्यमंत्र्यांकडेच हे खातं राहिलं आहे, असं शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे म्हणाल्या. शिवसेनेच्या या मागणीवर आता काँग्रेस-राष्ट्रवादी काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.