त्यावेळी 'आकडा' जमत नव्हता; पृथ्वीराज चव्हाणांच्या 'त्या' विधानावर शिवसेनेची स्पष्टोक्ती

काँग्रेसने २०१४ मध्ये शिवसेनेचा युतीचा प्रस्ताव धुडकावून लावला होता, असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता.

Updated: Jan 22, 2020, 08:14 AM IST
त्यावेळी 'आकडा' जमत नव्हता; पृथ्वीराज चव्हाणांच्या 'त्या' विधानावर शिवसेनेची स्पष्टोक्ती title=

मुंबई: २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेकडून काँग्रेस-राष्ट्रवादीला युतीची ऑफर देण्यात आल्याच्या मुद्द्यावर अखेर 'सामना'तून भाष्य करण्यात आले आहे. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र यायचे ठरवले असते तरी 'आकडा' जमत नव्हता. मारून मुटकून हा आकडा जमवला असता तरी भाजपकडून घोडेबाजार आणि तोडफोडीचा धोका होता, असे सांगत शिवसेनेने या चर्चेत काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. 

काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१४ मध्ये शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीपुढे युतीचा प्रस्ताव मांडल्याचा गौप्यस्फोट केला होता. मात्र, काँग्रेसने हा प्रस्ताव धुडकावून लावल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले होते. साहजिकच यानंतर भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर ताशेरे ओढण्यात आले होते. 

पृथ्वीराज यांचा गौप्यस्फोट म्हणजे शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न?

या पार्श्वभूमीवर आज 'सामना'तून शिवसेनेने आपली बाजू मांडली आहे. २०१४ मध्ये भाजप १२२ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे अनुक्रमे ६३, ४२ आणि ४१ जागा होत्या. त्यावेळी काँग्रेस थेट तिसऱ्या स्थानावर फेकला गेला होता. त्यामुळे शिवसेनेने काँग्रेसकडे युतीचा प्रस्ताव घेऊन जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 

विशेष म्हणजे त्यावेळी गुरुमहाराजांनी दिशा दाखवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे आमचा खरा चेहरा उघड झाला असे म्हणणाऱ्या भाजपचा मुखवटा तेथेच गळून पडला होता, असे शिवसेनेने म्हटले आहे. तसेच तार्किकदृष्ट्या विचार करायचा झाल्यासही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊनही २०१४ मध्ये संख्याबळाचा आकडा जमत नव्हता. फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सगळ्याचा अभ्यास करावा. जेणेकरून स्वत:च्याच चेहऱ्यावर मुखवटे खाजवत बसण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही, असा टोला 'सामना'तून भाजपला लगावण्यात आला आहे. 

२०१४ मध्येही शिवसेनेला काँग्रेसशी युती करायची होती- पृथ्वीराज चव्हाण