Shivsena: ठाकरे-शिंदे संघर्षात आणखी एक ट्विस्ट, ते नाव ही गोठवलं जाणार?

ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पण यावरुन ही संघर्ष होण्याची शक्यता आहे.

Updated: Oct 9, 2022, 04:22 PM IST
Shivsena: ठाकरे-शिंदे संघर्षात आणखी एक ट्विस्ट, ते नाव ही गोठवलं जाणार? title=

रामराजे शिंदे, नवी दिल्ली : शिवसेनेचं धनुष्यबाण (Arrow and bow) हे निवडणूक चिन्ह गोठवण्यात आलंय. अगदी शिवसेना हे नावही ठाकरे आणि शिंदे गटाला वापरता येणार नाहीये. त्याचमुळे ठाकरे गटानं 3 नवीन नावं आणि 3 चिन्हांची तयारी केलीय. पण आता यात दोन ट्विस्ट आलेत. केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेनेचं चिन्ह गोठवलं. एवढंच नाही तर शिवसेना असं नावही आता ठाकरे आणि शिंदे गटाला वापरता येणार नाही. त्यामुळेच ठाकरे गटानं आता निवडणूक आयोगाला 3 नवी चिन्हं आणि 3 नव्या नावांचा प्रस्ताव दिलाय.

ठाकरेंकडून 3 नवीन चिन्हं

त्रिशूळ , उगवता सूर्य, मशाल अशी निवडणूक चिन्हं देण्याचा प्रस्ताव ठाकरे गटानं निवडणूक आयोगाला दिल्याचं समजतंय.

शिवसेना असं नावही अंधेरी पोटनिवडणुकीपुरतं वापरता येणार नाही. मात्र शिवसेना नावाच्या पुढे उपनाम जोडता येणार आहे. त्यामुळे ठाकरे गटानं तीन नावांचाही प्रस्ताव दिलाय. मिळालेल्या माहितीनुसार..

शिवसेना बाळासाहेब ठाकरे
शिवसेना प्रबोधनकार ठाकरे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

अशी नावं शिवसेनेनं निवडणूक आयोगासमोर सादर केली आहेत.

ठाकरेंनी सुचवलेल्या नावांवर शिंदेंचाही डोळा?

पण यात पहिला ट्विस्ट असा आलाय की निवडणूक आयोगाकडे शिल्लक असलेल्या चिन्हांच्या यादीत ठाकरे गटानं सादर केलेली चिन्हंच नाहीत. अशी माहिती सुत्रांनी दिलीये. आता यात दुसरा ट्विस्ट असा आहे की शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाची मागणी ठाकरे गटानं केलीय. परंतु तेच नाव शिंदे गटालाही हवंय. दोन्ही गटानं एकाच नावाची मागणी केल्यानं हे नावही गोठवण्यात येण्याची शक्यता आहे.

ठाकरे-शिंदे गटातल्या वादामुळे 33 वर्षांपासून शिवसेनेची ओळख असलेलं चिन्हं आणि नाव गोठवलं गेलंय. पण आता जी पर्यायी नावं देण्यात आलीयत त्यावरुनही दोन्ही गट आमने-सामने आलेत. त्यामुळे आयोगासमोर नवा पेच निर्माण झालाय.